नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन गुगलने भारतात काल नव्या सुविधा लाँच केल्या. गुगल तेज या पैशांच्या देवानघेवानीशी संबंधीत अॅपचे नाव बदलून गुगल पे करण्यात आले आहे. याच अॅपद्वारे गुगल पुढील काही महिन्यांपासून कर्ज वाटणार आहे. यासाठी गुगलने काही बँकांशी सहकार्य करार केला आहे.
सर्वसामान्य भारतीयांपर्यंत गुगल पोहोचली आहे. सर्च इंजिन, अँड्रॉईड, जीमेलसह बऱ्याच सुविधा गुगल पुरविते. गेल्या वर्षीच गुगलने युपीआयवर आधारित गुगल तेज अॅप आणले होते. मात्र, भारतातील 14 लाख कोटींची बाजारपेठ पाहता गुगलनेही विस्तार करण्यासाठी अॅपचे नाव बदलत आणखी एक मोठा बदल करण्याचे ठरविले आहे.
गुगल पे या अॅपद्वारे कर्जही मिळणार आहे. यासाठी गुगलने एचडीएफसी, आयसीआयसीआय, फेडरल बँक आणि कोटक महिंद्रा बँकेशी करार केला आहे. 2023 पर्यंत तब्बल 70 लाख कोटींवर भारतीय डिजिटल पेमेंट बाजार जाणार आहे. ही संधी साधण्यासाठी अनेक कंपन्या बाजारपेठेत उतरल्या आहेत. पेटीएम, अॅमेझॉन, व्होडाफोन, एअरटेलसारख्या कंपन्या यामध्ये आहेत.
⚡️ Announcing #GooglePayhttps://t.co/XLU9n4ByNI
— Google Pay India (@GooglePayIndia) August 28, 2018
भलेही नोटाबंदी अपयशी ठरली असेल, तरीही यामुळे डिजिटल पेमेंटसाठी हा सुवर्ण काळ ठरला आहे. या काळात कंपन्यांनी कॅशबॅकसारख्या विविध ऑफर्स देऊन लोकांना आकर्षित केले आहे. गुगल ही खूप मोठी कंपनी आहे. पेटीएमला यामुळे मोठी स्पर्धा मिळू शकेल. पेटीएममध्ये चीनच्या अलिबाबा, जपानची सॉफ्टबँक आणि वॉरेन बफे यांच्या हॅथवेने मोठी गुंतवणूक केली आहे. पेटीएम या बळावर देशाच्या कानाकोपऱ्यात इंटरनेट बँकिंग सेवा पुरवत आहे. पुढील काळात पेटीएम विमा आणि म्युच्युअल फंडही सुरु करणार आहे. परंतू, गुगलच्या कर्ज उपलब्ध करण्याच्या योजनेमुळे आव्हान उभे राहणार आहे.