नवी दिल्ली : देशातील सर्वाधिक २७८७ नवोदित उद्योग (स्टार्टअप) महाराष्ट्रात आहेत. नव्याने उद्योग सुरू करण्यासाठी गुजरात हे सर्वोत्तम राज्य ठरले आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभागाने (डीआयपीपी) यासंबंधीची मानांकने गुरूवारी घोषित केली. त्यामध्ये गुजरात हे सर्वोत्तम राज्य ठरले असले तरी देशामध्ये स्टार्टअपच्या संख्येत गुजरात अखेरच्या स्थानी आहे. तेथील स्टार्टअपची संख्या अवघी ७६४ आहे.
स्टार्टअप क्षेत्रात राज्य सरकारांनी केलेल्या कामाची पाहणी डीआयपीपीने अलिकडेच केली. धोरण आखणे, नवोदित उद्योगांचे हब उभारणे, कल्पकतेला वाव, उद्योगांशी संवाद या माध्यमातून राज्य सरकारांनी स्टार्टअपसाठी पोषक वातावरण निर्मितीसाठी केलेल्या उपाययोजना यांचा या पाहणीत समावेश होता. २७ राज्ये व ३ केंद्रशासित प्रदेश यात सहभागी झाले होते. त्यांना सर्वोत्तम, अग्रणी, महत्त्वाकांक्षी, उदयोन्मुख आदी श्रेणीत क्रमांक देण्यात आला. यामध्ये महाराष्ट्राला ‘उदयोन्मुख’ हे मानांकन मिळाले.
या सर्वेक्षणात डीआयपीपीच्या चमूने उद्योजक, व्यापारी यांना ४० हजार मोबाइल कॉल्स केले. त्याद्वारे राज्यांमधील स्टार्टअप धोरणाची स्थिती जाणून घेण्यात आली. राज्यात अधिकाधिक स्टार्टअप उद्योग सुरू होण्यासाठी गुजरातने १०० कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली होती. त्याचा २०० उद्योग प्रकल्पांना लाभ झाला. यामुळेच गुजरातला यामध्ये सर्वोत्तम राज्याचा खिताब मिळाला आहे.
विविध मानांकने अशी
अग्रणी राज्ये : कर्नाटक, केरळ, ओरिसा व राजस्थान
स्टार्टअप लीडर : आंध्रप्रदेश, बिहार, छत्तीसगड, मध्यप्रदेश व तेलंगणा
महत्त्वाकांक्षी राज्ये : हरियाणा, हिमाचलप्रदेश, झारखंड, उत्तरप्रदेश व पश्चिम बंगाल
उदयोन्मुख राज्ये : महाराष्ट्र, आसाम, दिल्ली, गोवा, जम्मू-काश्मिर, पंजाब, तामिळनाडू व उत्तराखंड
नवोदित राज्ये व केंद्रशासित प्रदेश : चंदीगड, मणिपूर, मिझोराम, नागालॅण्ड, पुडूच्चेरी, सिक्कीम व त्रिपुरा