नवी दिल्ली : नोटाबंदी आणि वस्तू व सेवा कराचा (जीएसटी) फॅशन उद्योगास जबर फटका बसला असून, या क्षेत्राची यंदाची दिवाळी मंदीतच राहिली. फॅशन उद्योगातील व्यावसायिकांनीच ही माहिती दिली.
‘पॅरिस रनवेज’मध्ये नेहमी सहभागी होणारे डिझायनर राहुल मिश्रा यांनी सांगितले की, नोटाबंदीचा निर्णय अत्यंत चांगला होता. मात्र, त्याची अंमलबजावणी फारच वाईट पद्धतीने करण्यात आली. त्यांनी व्यापक दृष्टिकोन ठेवलाच नाही. त्याने व्यवसाय (फॅशन) विस्कळीत केला. माझे टेलर आणि एम्ब्रायडर यांना नोटाबंदीचा सर्वाधिक फटका बसला. विणकर, हस्तकलाकार यांनाही फटका बसला. १ जुलैला जीएसटीची अंमलबजावणी झाली तेव्हाही याच लोकांना फटका बसला. आम्ही हस्त कामगारांकडून कपडे शिवून घेतो. त्यांची स्थिती नाजूक झाली आहे. मिश्रा यांनी म्हटले की, मी जीएसटीच्या विरुद्ध नाही; पण जीएसटीची वसुली पद्धत फारच वाईट आहे. समजा मी १ कोटींच्या मालाचा पुरवठा करतो. त्यावर मला आधीच १२ टक्के जीएसटी द्यावा लागेल. पुढील महिन्यात पुन्हा मला १२ टक्के कर भरावा लागेल. इतका कर आगावू भरून मला माल विकण्याची वाट पाहावी लागेल. हस्त उद्योगासाठी सरकारने स्वतंत्र कायदे करायला हवेत. मी जे काही विकतो आहे, त्यावरच कर लागायला हवा. मी जर विकतच नसेल आणि तरीही कर द्यावा लागत असेल, तर व्यवसाय कमी होईल. संधी कमी होतील. रोजगारही कमी होईल.
उद्योग विस्कळीत आणि अनियंत्रित
- मानक संस्था इकराने जारी केलेल्या अहवालात म्हटले की, भारतातील वस्त्रोद्योगास नोटाबंदी आणि जीएसटीचा मोठा फटका बसला आहे. हा उद्योग विस्कळीत आणि अनियंत्रित झाला आहे.
- डिझायनर सामंत चौहान यांनी सांगतिले की, दिवाळीत विक्री वाढेल, असे मला वाटले होते. तथापि, तसे काहीही घडले नाही. विक्री अर्ध्यावर आली. यंदा दिवाळीत मोठ्या पार्ट्याच झाल्या नाहीत. त्यामुळे लोक डिझायनर कपडे कशाला खरेदी करतील? हा नोटाबंदीचा परिणाम आहे, असे मला वाटते.
- फॅशन डिझाईन कौन्सिल आॅफ इंडियाचे अध्यक्ष सुनील सेठी यांनी सांगितले की, व्यवसाय कमी झाला आहे, यात शंकाच नाही. बाजारात लवकर सुधारणा होईल, अशी अपेक्षा आहे.
- नोटाबंदीचा निर्णय अत्यंत चांगला होता. मात्र, त्याची अंमलबजावणी फारच वाईट पद्धतीने करण्यात आली. त्यांनी व्यापक दृष्टिकोन
ठेवलाच
नाही.
नोटाबंदी, जीएसटीचा ‘फॅशनेबल’ फटका; वाईट अंमलबजावणीमुळे झाला परिणाम, फॅशन उद्योग अडचणीत
नोटाबंदी आणि वस्तू व सेवा कराचा (जीएसटी) फॅशन उद्योगास जबर फटका बसला असून, या क्षेत्राची यंदाची दिवाळी मंदीतच राहिली. फॅशन उद्योगातील व्यावसायिकांनीच ही माहिती दिली.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 01:55 AM2017-11-01T01:55:43+5:302017-11-01T01:56:05+5:30