मुंबई : टाटा उद्योग समुहाने देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. देशातील सर्वाधिक पसंतीचा ब्रँड बनला असतानाच जगातील पहिल्या 100 ब्रँडमध्येही एकमेव भारतीय ब्रँड म्हणून जागा पटकावली आहे. इंग्लंडच्या ब्रँड फायनान्स या सल्लागार संस्थेने 2019 मधील टॉप 500 ब्रँडमध्ये टाटा समुहाला 86 व्या स्थानावर ठेवले आहे. मागील वर्षी टाटा 104 व्या स्थानावर होता. तर अॅमेझॉन कंपनी 13.36 लाख कोटींच्या ब्रँड व्हॅल्यूसह पहिल्या स्थानावर आहे.
ब्रँड फायनान्सचे कार्यकारी अधिकारी डेव्हिड हेग यांनी सांगितले की, 2019 मध्ये टाटा समुहाच्या मुल्यामध्ये कमालीची वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 37.4 टक्क्यांची वाढ झाली. यामुळे टाटा समुहाने 18 जागांची मजल गाठत 86 वे स्थान पटकावले.
यावर टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी सांगितले की, जगातील टॉप 100 मध्ये देशाची एकमेव कंपनी बनणे टाटा समुहाला भविष्यात सामाजिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मदत करेल. लोकांना चांगली उत्पादने देण्याचा प्रयत्न राहील.
टाटा समुहाची ब्रँड व्हॅल्यू वाढण्यामागे सिंहाचा वाटा टीसीएसचा आहे. यासह वाहनक्षेत्र आणि स्टील कंपन्यांनीही मदत केली आहे. जगातील टॉप 500 बँडमध्ये भारतातील 9 ब्रँडचा समावेश आहे. टाटानंतर एलआयसीचा नंबर लागतो. एलआसी 277 व्या स्थानावर आहे. तर इन्फोसिस 315 आणि एसबीआय 344 व्या क्रमांकावर आहे. रिलायन्स 450 व्या स्थानावर आहे.