ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 21 - रिलायन्स जिओविरोधात व्होडाफोनने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. रिलायन्स जिओने दिलेली फ्री व्हॉइस कॉलिंग सेवा ट्रायच्या नियमांचं उल्लंघन करणारी आहे, तसेच ट्राय याकडे दुर्लक्ष करत आहे अशी तक्रार व्होडाफोनने केली आहे.
जिओने फ्री व्हॉइस कॉल्स ऑफर ही प्रमोशनल ऑफर म्हणून 90 दिवसांहून अधिक काळ सुरू ठेवली, त्यामुळे जिओने इंटर-कनेक्टेड यूसेज चार्जेस (आययूसी) आणि ट्रायच्या नियमांचं उल्लंघन केलं आहे असा आरोप व्होडाफोनने लावला आहे. ट्रायच्या नियमानुसार आययूसीने एक मूलभूत दर निश्चित केला होता त्यानुसार निश्चित दरापेक्षा कमी दराची ऑफर देता येत नाही असे व्होडाफोनने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
याप्रकरणी 27 फेब्रुवारीला दिल्ली हायकोर्टात सुनावणी होणार आहे. ट्रायने जिओला क्लिन चिट दिली आहे, तरीही व्होडाफोनची तक्रार असेल तर त्यांनी एअरटेल आणि आयडिया कंपनीप्रमाणे ट्रायब्युनल (TDSAT) कडे तक्रार करावी असं जिओने म्हटलं आहे.