२० हजार भाविकांनी अनुभवला लोकसहभाग व आनंदाचा सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 11:21 PM2017-12-10T23:21:45+5:302017-12-10T23:22:09+5:30
रात्रीचे १२.३० नंतर उंट, घोडा, रथ, बग्गी सोबतच महिलांचे लेझीम, टिपरी पथके. बाल, महिला व पुरुषांच्या विविध दिंड्याच्या गजरात धार्मिकतेकडे पाठ फिरविलेले आजचे युवा वर्ग दिंडीच्या तालात थिरकले.
आॅनलाईन लोकमत
चंदनखेडा : रात्रीचे १२.३० नंतर उंट, घोडा, रथ, बग्गी सोबतच महिलांचे लेझीम, टिपरी पथके. बाल, महिला व पुरुषांच्या विविध दिंड्याच्या गजरात धार्मिकतेकडे पाठ फिरविलेले आजचे युवा वर्ग दिंडीच्या तालात थिरकले. चंदनखेडा येथील घोडा उत्सवाचा हा सोहळा गावखेड्यातून तसेच दूरवरुन आलेल्या २० हजार भाविकांनी आनंदात अनुभवला.
भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा या ऐतिहासिक गावात गोंडकालीन पुरातन किल्ला आहे. येथे घोड्याची समाधी आहे. हे सर्वधर्मीय श्रद्धास्थान असून येथे गाव परीसरातील सर्वच धर्माचे लोक श्रद्धेने पुजाअर्चा करतात. घरातील कुठल्याही कार्याची सुरुवात घोड्याची पूजन करून केली जाते. २ ते ४ डिसेंबरला येथे घोडा उत्सव पार पडले.
परिसर स्वच्छता, कुश स्थापना सोबतच शालेय मुलांकरिता सुंदर विचार स्पर्धा, समुह नृत्य स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, भक्तगीत स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. प्रबोधनामध्ये चिमूरचे प्रा. अशोक चरडे महाराज, सप्त खंजेरीवादक उदयपाल महाराज, मोझरीचे प्रकाश वाघ महाराज, कापसे महाराज यांचे कीर्तन व अंध बाल कलावंत चेतन उकीनकर यांचा ‘जीवनाचा मंत्र’ या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्यासाठी उसळलेल्या गर्दीने गावातील मुख्य रस्ते फुलून गेले होते. रांगोळी, तोरणपताका, विद्युत रोषणाई व शुभेच्छा फलक तसेच बाहेरगावातील भक्तांकरिता नाश्ताची मोफत सेवा उपलब्ध करण्यात आली होती.
महिलांना मंदिर प्रवेश तथा प्रसाद सेवनाचा समानतेचा सामाजिक अधिकार मिळाल्याने त्याही स्वंयप्रेरणेने सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. गाव परिसरातील प्रत्येक कुटुंबातील, कधी एकत्र न आलेले नातलग, या निमित्ताने एकत्रित आले होते. महाप्रसाद वाटपाने घोडा उत्सवाचा समारोप करण्यात आला.
विशेष म्हणजे, सुरक्षेची जबाबदारी पोलीस विभागासोबतच गाव परिसरातील महिला युवावर्गानी स्वयंप्रेरणेने पार पाडली. उत्सवासाठी समिती कार्यकर्ते, गावकरी तसेच भक्तांनी परिश्रम घेतले.