सहा दिवसात २१ लाख वृक्षलागवड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2018 10:39 PM2018-07-07T22:39:08+5:302018-07-07T22:40:06+5:30
अतिशय नियोजित पध्दतीने आखण्यात आलेल्या १३ कोटी वृक्षलागवडीच्या उद्दिष्टाला चंद्रपूर जिल्हयातील प्रशासनाने व नागरिकांनी मोठया प्रमाणात प्रतिसाद देत असल्याचे पुढे आले आहे. १ जुलै ते ६ जुलै या काळामध्ये चंद्रपूर जिल्हयात २१ लाखांवर वृक्षलागवड झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : अतिशय नियोजित पध्दतीने आखण्यात आलेल्या १३ कोटी वृक्षलागवडीच्या उद्दिष्टाला चंद्रपूर जिल्हयातील प्रशासनाने व नागरिकांनी मोठया प्रमाणात प्रतिसाद देत असल्याचे पुढे आले आहे. १ जुलै ते ६ जुलै या काळामध्ये चंद्रपूर जिल्हयात २१ लाखांवर वृक्षलागवड झाली आहे. नेहमीप्रमाणे वनविभागाने यामध्ये सर्वाधिक वाटा उचलला असून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या गृह जिल्हयातील वृक्षलागवड उद्दिष्टांकडे अग्रेसर होत आहे.
२७ जून रोजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा परिषदेच्या आवारात आयोजित कार्यक्रमामध्ये संपूर्ण जिल्ह्याला यावेळी वृक्षलागवडीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. यावेळी त्यांनी वृक्षदिंडीला सुरुवात केली होती. त्यानंतर पूर्व विदर्भात आमदार अनिल सोले यांच्या नेतृत्वात निघालेल्या वृक्षदिंडीचा समारोप नागपूरमध्ये वनमंत्री यांच्या उपस्थित करण्यात आला. या ठिकाणीदेखील त्यांनी सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी वृक्षलावडीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. जिल्हयातील प्रत्येक सजग नागरिकाने एक वृक्ष लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे. आम्ही लावले तुम्ही ही सहभागी व्हा, असे आवाहन वनविभाग प्रत्येक कार्यक्रमात करत आहे. या सर्व आवाहानाला राज्यभर उत्तम प्रतिसाद मिळत असून गृह जिल्हा असणाऱ्या चंद्रपूरमध्येदेखील मोठया प्रमाणात वृक्षलावगड सुरु झाली आहे.
पहिल्या सहा दिवसात वनविभागाकडे आलेल्या आकडेवारीनुसार वनविभागाने सहा जुलैपर्यंत १३ लाख ३६ हजार ४७८ वृक्षलागवड केली आहे. त्यापाठोपाठ वनविकास महामंडळाने चार लाख ९ हजार ५३४ वृक्षलागवड केली आहे. चंद्रपूर जिल्हयातील अन्य विभागांमध्ये ग्रामपंचायतीमार्फत दोन लाख ५२ हजार वृक्षलागवड केली आहे. सामाजिक वनीकरण विभागामार्फत एक लाख २४ हजार ३२५ वृक्ष लावले आहेत. तथापि, कृषी विभाग, ग्रामविकास विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व अन्य काही प्रमुख विभागांनी मोठे उद्दिष्ट घेतले असले तरी सुरुवातीच्या वृक्षलागवडीच्या मोहिमेत त्यांनी गती घेणे आवश्यक आहे. सामान्य नागरिकांनी मात्र मोठया प्रमाणात या काळात वृक्षलागवड केली असून जिल्हा परिषद व महानगरपालिका क्षेत्रातही पुढील आठवडयात मोठया प्रमाणात वृक्षलागडीचे संकेत आहेत.
जिल्हयामध्ये मोठया प्रमाणात पाऊस झाल्यामुळे वृक्षलागवडीला गती मिळण्याचे संकेत असून वनविभाग व जिल्हाधिकारी कार्यालयाने संबंधित विभागाच्या उद्दिष्टपूतीर्साठी प्रयत्न सुरु केले आहे.
याबाबतचा रोजचा आढावा घेतला जात असून आगामी काळात सामान्य नागरिकांनीदेखील या मोहिमेमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सुधीर मुनगंटीवार आज घेणार आढावा
राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे ८ जुलै रोजी जिल्ह्यातील विविध योजनांच्या बाबत आढावा घेणार आहेत. याशिवाय जिल्ह्यामध्ये गेल्या काळामध्ये राबविण्यात आलेल्या विविध योजनांच्या सादरीकरणाचे आदेशही त्यांनी संबंधित विभागाला दिले आहेत. राज्याच्या विधान सभेचे पावसाळी अधिवेशन नागपूर येथे सुरु असताना शनिवार व रविवार चंद्रपूर येथील विविध विकास कामांचा आढावा घेणे सुरु असून रविवारी नियोजन भवनात दुपारी ४ वाजता विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. अटल विश्वकर्मा सन्मान योजनेंतर्गत बांधकाम कामगारांचे विशेष नोंदणी अभियानाचा शुभारंभ करणार असून पांदणरस्ते योजनेचाही आढावा घेतील. खोज स्पधेर्चे बक्षीस वितरणही त्यांच्या हस्ते होईल.