गौण खनिजाचे उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई
By admin | Published: June 13, 2016 02:26 AM2016-06-13T02:26:27+5:302016-06-13T02:26:27+5:30
तालुक्यातील सोंद्री येथील वैनगंगा घाटावर अवैध गौण खनिजाचे उत्खनन सुरू असल्याच्या गुप्त माहितीवरून शनिवारी रात्री महसूल विभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन कारवाई केली.
जेसीबी मशीन जप्त : वाळू तस्करांचे धाबे दणाणले
ब्रह्मपुरी : तालुक्यातील सोंद्री येथील वैनगंगा घाटावर अवैध गौण खनिजाचे उत्खनन सुरू असल्याच्या गुप्त माहितीवरून शनिवारी रात्री महसूल विभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन कारवाई केली. यावेळी उत्खननासाठी वापरण्यात येणारी जेसीबी मशिन जप्त केली.
तालुक्यात सध्या सोंद्री व बोढेगाव असे दोन घाट रेतीसाठी अधिकृत आहेत. अटी व शर्थींच्या अधिन राहून रेती उत्खनन करण्याचा नियम आहे. परंतु रेतीमाफीया या अटी व शर्थींना पायदळी तुडवून अवैध गौण खनिजांचा उपसा करीत असतात. याची कुणकूण महसूल विभागाला अनेक दिवसांपासून होती. या आधारावर तलाठी, मंडळ अधिकारी व नायब तहसीलदार यांनी शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घाटावर धाड मारली. पीसी-२०० क्रमांकाची जेसीबी मशीन घाटावर उतरवून उत्खनन सुरू असल्याचे यावेळी आढळून आले. त्यामुळे सदर जेसीबी मशीन जप्त करण्यात आली. यावेळी घाटावर ११ ट्रक उभे होते. सदर कारवाई केल्यानंतर दंडात्मक कार्यवाहीसाठी प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. घाट मालकावर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही कारवाई उपविभागीय अधिकारी उमेश काळे, तहसिलदार अशोक शिऊरकार यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसिलदार पुंडेकर यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)
अवैध गौण खनिज प्रकरणात मागील वर्षभरात २४८ प्रकरणात २० लाख ८६ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. तसेच एका प्रकरणात गुन्हा नोंदविलेला आहे. या प्रकरणात दोषींवर कडक कारवाई अवश्य होईल व यापुढे कोणाचीही गय केल्या जाणार नाही.
- अशोक शिऊरकार, तहसीलदार, ब्रह्मपुरी