अपर कामगार आयुक्त आणि व्यवस्थापनाचा ठेंगा
By Admin | Published: April 8, 2017 12:44 AM2017-04-08T00:44:22+5:302017-04-08T00:44:22+5:30
गुप्ता एनर्जीच्या प्रकल्पग्रस्त कामगारांच्या उपोषणाला पंधरवडा उलटून अद्यापपर्यंत प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.
बैठकीला अनुपस्थित : गुप्ता एनर्जीच्या कामगारांचे उपोषण सुरूच
चंद्रपूर : गुप्ता एनर्जीच्या प्रकल्पग्रस्त कामगारांच्या उपोषणाला पंधरवडा उलटून अद्यापपर्यंत प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी नागपूर येथील अपर कामगार आयुक्तांकडे बैठक घेण्यात आली. ती बैठक अपयशी ठरल्याने कामगारांचे १८ व्या दिवशीही उपोषण सुरूच होते.
नागपूर येथील बैठकीला कामगारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. परंतु गुप्ता एनर्जीचे व्यवस्थापन व अपर कामगार आयुक्त स्वत: गैरहजर होते. त्यामुळे कामगाराच्या समस्या सोडविण्यात प्रशासन उदासिन असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कामगाराच्या मनात प्रशासनाबद्दल रोष उत्पन्न झाला आहे. प्रशासनाकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे कामगारांनी रवीभवन, नागपूर येथे आ. बच्चू कडू यांची भेट घेतली. त्यांना आपल्या समस्या सांगितल्या.आ. कडू यांनी या प्रकल्पग्रस्त कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. प्रकल्पग्रस्त कामगारांच्या समस्येकडे प्रशासनाकडून व्यवस्थापनावर कोणतीही कार्यवाही होत नसेल तर आगामी काळात कंपनीत घुसून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे. (प्रतिनिधी)