उत्तीर्ण होऊनही ९९.८५ टक्के विद्यार्थी शिष्यवृत्तीतून बाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 12:33 AM2017-12-21T00:33:11+5:302017-12-21T00:33:44+5:30

गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना शिक्षणात आर्थिक हातभार लागावा यासाठी राज्य शासनाकडून सर्व व्यवस्थापनातील इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते.

After passing 99.85 percent students from scholarship | उत्तीर्ण होऊनही ९९.८५ टक्के विद्यार्थी शिष्यवृत्तीतून बाद

उत्तीर्ण होऊनही ९९.८५ टक्के विद्यार्थी शिष्यवृत्तीतून बाद

Next
ठळक मुद्देसर्व व्यवस्थापनातील शाळा : इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांचा हिरमोड

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना शिक्षणात आर्थिक हातभार लागावा यासाठी राज्य शासनाकडून सर्व व्यवस्थापनातील इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. २०१६-१७ या वर्षात १३ हजार ६८३ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यातील १३ हजार ५१२ विद्यार्थी उत्तीर्णही झाले. मात्र, केवळ २० विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाल्याने ९९़.८५ टक्के विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे.
गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आर्थिक प्रोत्साहन देण्याचे काम शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून शासनाकडून सुरू आहे. या शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांला इयत्तेनुसार मासिक १०० ते २०० रूपये शिष्यवृत्ती दिली जाते. यापूर्वी ही परीक्षा इयत्ता चवथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जात होती. मात्र, नव्या धोरणानुसार ही शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व आठवीसाठी लागू केली आहे. २०१६-१७ या वर्षात सर्व व्यवस्थापनाच्या माध्यमिक गटाच्या पाचवीमधील ७ हजार २८८ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा दिली. यातील ७ हजार २३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. परंतु, यातील केवळ २० विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. तर इयत्ता आठवीच्या ६ हजार ३९५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यातील ६ हजार २८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मात्र यातील एकाही विद्यार्थ्याची निवड झाली नाही.
केवळ गोंडपिपरीच्या विद्यार्थ्यांची निवड
माध्यमिक गटातील ७ हजार २८८ विद्यार्थ्यांपैकी ७ हजार २३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ३ हजार ८६३ मुले तर ३ हजार ३६७ मुलींचा समावेश आहे. या निकालाची टक्केवारी ९९.२० असली तरी यातील केवळ २० विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. विशेष म्हणजे, शिष्यवृत्तीसाठी निवड झालेले २० विद्यार्थी हे केवळ गोंडपिपरी तालुक्यातीलच आहेत.
हायस्कूल गटातील विद्यार्थी मेरीटमध्ये माघारले
आठव्या वर्गातील ६ हजार ३९५ विद्यार्थ्यांपैकी ६ हजार २८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या निकालाची टक्केवारी ९८.२३ एवढी आहे. मात्र, यातील एकाही विद्यार्थ्याची शिष्यवृत्तीसाठी निवड झालेली नाही. गुणवत्ता यादीनुसार शिष्यवृत्तीसाठी निवड होत असल्याने उत्तीर्ण झालेल्या अनेक विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे.

प्रत्येक जिल्ह्याला शिष्यवृत्तीसाठी निवड विद्यार्थ्यांचा कोटा शासन ठरवून देत असतो. यात ग्रामीण व शहरी भागाचा समावेश असतो. शंभर टक्के निकाल लागला तरी गुणवत्ता यादीनुसार शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्याची निवड होते. त्यामुळे शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे.
- राम गारकर,
शिक्षणाधिकारी (प्राथ.) चंद्रपूर.

Web Title: After passing 99.85 percent students from scholarship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.