नगरपालिकेच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर सेक्स व्हिडीओ पोस्ट झाल्यामुळे उडाली खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:22 AM2018-01-22T00:22:51+5:302018-01-22T12:41:45+5:30
कार्यालयीन कामकाजाच्या दृष्टीने मदत व्हावी, कामकाजाविषयी मत-मतांतरे प्रगट व्हावी, या हेतुने नगरपालिकेतील एका कर्मचाऱ्याने पालिका अधिकारी, कर्मचारी व पदाधिकाऱ्यांचा एक व्हॉट्स अॅप ग्रुप तयार केला. यात महिलांचाही समावेश आहे.
रवी रणदिवे।
आॅनलाईन लोकमत
ब्रह्मपुरी : कार्यालयीन कामकाजाच्या दृष्टीने मदत व्हावी, कामकाजाविषयी मत-मतांतरे प्रगट व्हावी, या हेतुने ब्रह्मपुरी नगरपालिकेतील एका कर्मचाऱ्याने पालिका अधिकारी, कर्मचारी व पदाधिकाऱ्यांचा एक व्हॉट्स अॅप ग्रुप तयार केला. यात महिलांचाही समावेश आहे. मात्र रविवारी या ग्रुपवर एका आंबटशौकीन ग्रुप सदस्याने सात-आठ अश्लिल व्हिडीओ टाकल्यामुळे ब्रह्मपुरीत एकच खळबळ उडाली आहे. रविवारी दिवसभर शहरात याच ग्रुप व त्यातील पोस्टविषयीची खमंग चर्चा होत राहिली.
ब्रह्मपुरी नगरपरिषदेत सध्या स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये पालिकेला क्रमांक मिळावा म्हणून अधिकारी, कर्मचारी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. ब्रह्मपुरीला चांगला क्रमांक मिळून शहर स्वच्छ व सुंदर व्हावे, यासाठी नगरसेवकांनीही पालिका पदाधिकारी या नात्याने आपले कर्तव्य बजावावे, असा पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मानस आहे. पालिकेच्या सकारात्मक कार्यात नगरसेवकांचाही सहभाग असावा, या हेतुने पालिकेतील एका कर्मचाºयाने व्हॉट्स अॅपवर एक ग्रुप तयार केला. पालिकेतील अधिकारी, कर्मचारी व नगरसेवकांना यात समाविष्ट केले. सहाजिकच यात महिलांचाही समावेश आला. कुठल्याही मुद्यावर निष्पक्ष चर्चा व्हावी, पालिकेच्या कामकाजाविषयी सर्वजण अवगत व्हावे, हाही या ग्रुप तयार करण्यामागील उद्देश. मात्र एका आंबटशौकीन ग्रुप सदस्याला ग्रुप तयार करण्यामागील गांभीर्य व ग्रुपच्या मर्यादेचे भान राहिले नाही. ग्रुपमध्ये महिला असतानाही या आंबटशौकिनाने चक्क सात-आठ अश्लिल व्हिडीओ ग्रुपवर वायरल केले. अश्लिल व्हिडोओ ग्रुपवर येताच प्रथम ग्रुपमधील पालिका अधिकारी, कर्मचारी आणि नगरसेवकांमध्ये आणि नंतर याची सर्वत्र चर्चा होताच संपूर्ण ब्रह्मपुरीतच खळबळ उडाली.
रविवारी शहरात दिवसभर नगरपालिकेच्या या ग्रुपची व त्यातील पोस्टचीच चर्चा सुरू राहिली. याबाबत अद्याप कुणीही तक्रार केलेली नाही. एका नगरसेवकाने झालेल्या प्रकाराची पोलीस तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, एका ग्रुप सदस्याकडून सदर अश्लील व्हिडोओ चुकीने पोस्ट झाल्याचे व त्याने माफी मागितल्याचे ग्रुप अॅडमीनने लोकमतशी बोलताना सांगितले. या संदर्भात मुख्याधिकारी मंगेश खवले यांच्याशी संपर्क साधला असता, आपण या ग्रुपमध्ये नाही. कुणाची तक्रार आल्यास कार्यवाही करू, असे लोकमतला सांगितले.