स्वच्छता दर्पण अनुक्रमणिकेत चंद्रपूर देशात पहिले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 01:57 PM2018-01-06T13:57:29+5:302018-01-06T13:58:17+5:30
हागणदारीमुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या देशातील जिल्ह्यांमध्ये चंद्रपूर अग्रेसर आहे. स्वच्छता दर्पण अनुक्रमणिकेत चंद्रपूरला भारतात पहिले स्थान मिळाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा परिषदेने २ आॅक्टोंबर २०१४ पासून स्वच्छ भारत अभियानांतर्गत सुरु केलेल्या हागणदारीमुक्त उपक्रमाला यश येत आहे. जिल्ह्यात केवळ १७६ कुटुंबांकडेच शौचालय नाही. हागणदारीमुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या देशातील जिल्ह्यांमध्ये चंद्रपूर अग्रेसर आहे. स्वच्छता दर्पण अनुक्रमणिकेत चंद्रपूरला भारतात पहिले स्थान मिळाले आहे.
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत केंद्र शासनाने संपूर्ण जिल्हे गोदरीमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. यासाठी देशभरातील जिल्हयांचे स्वच्छता दर्पण रँकींग देण्यात येत आहे. यात देशात आदिवासीबहुल व मागास समजल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. या जिल्ह्याला ६९.११ टक्के गुण मिळाले. केंद्र शासनाने केलेल्या मुल्यांकनात महाराष्ट्रातील बीड जिल्हा चौथ्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर मेघालयातील वेस्टखसी हिल्स, पंजाबमधील अमृतसरचा तिसरा, तर राजस्थानमधील डोलपूर जिल्हयाला पाचवा क्रमांक मिळाला आहे. महाराष्ट्रातील नाशिक ७, लातूर ९, अहमदनगर १०, उस्मानाबाद १६, औरंगाबाद ३८, अकोला ४२, परभणी ४५, वाशिम ५०, धुळ ५५, हिंगोली ६०, जळगाव ६३, तर अमरावती जिल्हा ६५ व्या क्रमांकावर आहे.
केंद्र पुरस्कृत अभियानात चंद्रपूर जिल्हा परिषदेला तीन लाख तीन हजार १३५ वैयक्तिक प्रसाधनगृहे बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. हे उद्दिष्ट जिल्हा परिषदेने पूर्णत्वास नेले आहे. जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामपंचायती गोदरीमुक्त करण्याचे निकष देण्यात आले होते. त्यात जिल्हा परिषदेला आतापर्यंत ८२३ ग्रामपंचायती गोदरीमुक्त करण्यात यश आले असून लवकरच उर्वरित चार ग्रामपंचायती गोदरीमुक्त करण्याचा संकल्प जिल्हा परिषदेने केला आहे. येत्या जानेवारी अखेरपर्यंत संपूर्ण जिल्हा गोदरीमुक्त होईल, अशी माहिती स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मोहिते यांनी दिली.
जिल्ह्यातील १४ तालुक्यातील ८२३ ग्रामपंचायती गोदरीमुक्त करण्यात यश आले आहे. जिवती तालुक्यातील चार ग्रामपंचायती शिल्लक आहेत. त्या लवकरच गोदरीमुक्त करण्याचा प्रयत्न केला जाईल. जनतेच्या सहकायार्मुळेच चंद्रपूर जिल्हा देशात अव्वल ठरला आहे.
- जितेंद्र पापळकर,
मुख्य कार्यकारी अधिकारी,
जि.प. चंद्रपूर.