शेतीपूरक व्यवसायाला शेतकऱ्यांनी प्राधान्य द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 11:47 PM2018-01-12T23:47:13+5:302018-01-12T23:47:42+5:30
शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीचे तंत्र बदलले पाहिजे. शेतकरी आत्मनिर्भर होण्यासाठी आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत तयार करून शासकीय योजनांचा पुरेपुर लाभ घ्यावा.
आॅनलाईन लोकमत
राजुरा : शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीचे तंत्र बदलले पाहिजे. शेतकरी आत्मनिर्भर होण्यासाठी आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत तयार करून शासकीय योजनांचा पुरेपुर लाभ घ्यावा. आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी अवगत करावे व शेतीपूरक व्यवसायाला प्राधान्य द्यावे, असे मार्गदर्शन माजी खासदार नरेश पुगलिया यांनी केले.
राजुरा तालुक्यातील प्रगतशिल शेतकऱ्यांच्या शेतीला त्यांनी भेट देवून पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. राजुरा तालुक्यातील उच्चशिक्षित तरुणांनी आधुनिक शेती तंत्रज्ञानाचीे कास धरली व पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीला प्राधान्य दिले. यामुळे मोठ्या प्रमाणावर लाभ मिळत आहे. याचा आदर्श इतर शेतकऱ्यांनी घ्यावा, यासाठी माजी खासदार नरेश पुगलिया यांनी प्रगतशिल शेतकºयांच्या भेटी घेतल्या व शेतीचे तंत्रज्ञान जाणून घेतले.
यात गोवरी येथील रामदास बोथले, पवनी येथील देविदास पडोळे, कापनगाव येथील नंदू रागीट व चनाखा येथील सुहास आसेकर व रिंकु मरस्कोल्हे यांच्या शेतीची पाहणी केली.
याप्रसंगी माजी आमदार प्रभाकर मामुलकर, जिल्हा परिषद सदस्य गोदरू पा. जुमनाके, शिवचंद काळे, गजानन गावंडे, देवेंद्र बेले, डॉ. सुरेश महाकुलकर, प्रवीण पडोळे, माजी जि. प. सदस्य अविनाश जाधव, अशोक नागापूरे, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, अॅड. अरुण धोटे, नासीर खान यांची उपस्थिती होती.
गोवरी येथील रामदास बोथले यांनी चार एकरात विविध पिकांची लागवड केली आहे. अद्रकच्या शेतीतून मोठा फायदा झाल्याचे त्यांनी सांगितले. पवनी येथील देविदास पडोळे यांनी चार एकरात मागील चार वर्षापासून व्ही.एन.आर. जातीचे पेरू, अॅपल बोर, सरस्वती सिताफळ, डाळींब लागवड केली आहे. यामुळे कमी जागेत भरपूर उत्पन्न मिळाले आहे. नंदू रागीट यांनी पिझ्झामध्ये वापर होणाऱ्या अॅल्यपिना जातीची मिरची लागवड केली. चनाखा येथील तरुण शेतकऱ्यांनी कृषी पर्यटन केंद्र सुरू केले आहे.
आधुनिक शेती करताना शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. यासाठी तालुका पातळीवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मदत केंद्र उभारले जावे. सुसज्ज माती परीक्षण लॅब, तज्ञ मार्गदर्शकांची चमू, पशुवैद्यकीय अधिकारी यांची सक्षम टीम कार्यरत असणे गरजेचे आहे.
- अविनाश जाधव
माजी जि.प. सदस्य.