शेतकऱ्यांनी टॉवरचे काम बंद पाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 11:42 PM2018-02-06T23:42:14+5:302018-02-06T23:42:40+5:30
पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन आॅफ इंडिया कंपनीच्या वतीने सावली तालुक्यातील शेतातून वीजवाहिनी टॉवर उभारणीचे काम सुरू आहे.
आॅनलाईन लोकमत
सावली : पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन आॅफ इंडिया कंपनीच्या वतीने सावली तालुक्यातील शेतातून वीजवाहिनी टॉवर उभारणीचे काम सुरू आहे. मात्र शेतकऱ्यांना कोणताही मोबदला न देता काम सुरू केल्याने विजय कोरेवार यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी मंगळवारी काम बंद पाडले.
पुगलूर ते रायपूर अशी ८०० केव्ही उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीकरिता सावली तालुक्यातील जीबगाव, उसेगाव, कवटी, रुद्रापूर या गावातील शेतातून टॉवर उभारणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र शेतकऱ्यांना विश्वासात न घेता व जागेचा कोणताही मोबदला न देता काम करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.
पॉवर ग्रीड या कंपनीचे काम असून मुजोरीपणाने काही शेतात पूर्ण टॉवर उभारण्यात आले आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी काँग्रेसचे गटनेता तथा पंचायत समिती सदस्य विजय कोरेवार यांच्याकडे तक्रार केली. उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे ३१ मे २०१७ चे परिपत्रकानुसार जमिनीची मोजणी करून शेतीचा मोबदला तीन टप्प्यात द्यायचा आहे. मात्र मोजणी न करता, मौका चौकशी न करता, जमिनीचा किती मोबदला देणार याबाबतची कुठलीही माहिती न देता काम सुरू केल्याने विजय कोरेवार यांनी या प्रकरणाची दखल घेत शेतकऱ्यांना घेऊन काम बंद पाडले.
मोबदला मिळाल्याशिवाय काम करू न देण्याचा निर्णय अशोक संगीडवार, पुरुषोत्तम येलेकार, वसंत मेश्राम, किशोर मुंगुले, लालाजी झरकर, प्रकाश मेश्राम, बापूजी आगरे, अमोल मुसद्दीवार, भास्कर राऊत, भास्कर आभारे आदी शेतकºयांनी घेतला आहे.