बल्लारपुरात कापड दुकानाला भीषण आग, लाखोंचा माल जळून राख
By राजेश भोजेकर | Published: June 19, 2023 10:55 AM2023-06-19T10:55:13+5:302023-06-19T10:56:52+5:30
सहा तासांनी आगीवर नियंत्रण
चंद्रपूर : बल्लारपूरच्या वस्ती विभागातील गांधी वार्डातील सर्वात जुन्या मोतीलाल प्रभुलाल मालु क्लाॅथ स्टोअर्स या कापड दुकानाला सोमवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत लाखो रुपयांचे कापड व अन्य साहित्य जळून राख झाले. तब्बल सहा तासांनी आग नियंत्रणात आली. तोपर्यंत दुकान जळून खाक झाले होते. शार्टसर्कीटमुळे आग लागल्याचा अंदाज दुकानाचे मालक सुरेश मालू यांनी व्यक्त केला.
पहाटे दोनच्या सुमारास लागलेली ही आग एवढी भयंकर होती. विझवायला बल्लारपूर पेपर मील, चंद्रपूर महानगरपालिका, पोंभुर्णा नगर पंचायत, राजुरा नगर परिषद, भद्रावती डिफेंस, माणिकगड, सीएसटीपीएस चंद्रपूर, अश्या सात अग्निशमन दलाच्या गाड्यांनी ४० फेऱ्या पाण्याचा मारा करून ही आग सकाळी आठ वाजेपर्यंत आटोक्यात आणली.
अग्नीशमन गाड्यांची फजिती
आग विझवण्यासाठी सर्वात आधी शब्बीर अली नगर परिषदची गाडी घेऊन पोहचले. नंतर इतर गाड्या आल्या परंतू दोन्ही बाजूने दुकाने असल्यामुळे व चौकात अतिक्रमणमुळे आग विझवायला अग्नीशमन दलाची फजिती झाली. गांधी वार्डातील दुकाने रस्त्यावर आल्यामुळे सदर परिसर अतिक्रमणांनी वेढलेला आहे. यामुळे दररोज येणाऱ्या जाणाऱ्यांशी हमरीतुमरी होते.
गांधी वार्डातील सर्वात जुन्या बाजारपेठेत दुकाने एकामेकास एवढी खेटून लागलेली आहे. आग भडकलेली असताना अग्नीशमननी केलेल्या पाण्याच्या मारामुळे ती पसरू शकली नाही, नाही तर संपूर्ण परिसर जळून खाक झाला असता. या परिसरात मालूची तीन दुकाने आहेत. त्यांचे कुटूंब ही २० जणासह राहतात. परंतू सावधानीमुळे कोणतीही जिवित हानी झाली नाही.