गोवरी येथील गुप्ता कोल वॉशरीजला टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 11:17 PM2018-03-26T23:17:33+5:302018-03-26T23:17:33+5:30
तालुक्यातील गोवरी येथे असलेल्या गुप्ता ग्लोबल रिसोर्सेस कंपनीने मागील एक वर्षापासून जमीन महसूल वसुलीची थकबाकी रक्कम जमा केली नाही. त्यामुळे तहसीलदार डॉ. रवींद्र होळी यांनी कंपनीच्या मुख्यद्वाराला टाळे लावल्याने तालुक्यातील इतर जमीन थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत.
आॅनलाईन लोकमत
राजुरा : तालुक्यातील गोवरी येथे असलेल्या गुप्ता ग्लोबल रिसोर्सेस कंपनीने मागील एक वर्षापासून जमीन महसूल वसुलीची थकबाकी रक्कम जमा केली नाही. त्यामुळे तहसीलदार डॉ. रवींद्र होळी यांनी कंपनीच्या मुख्यद्वाराला टाळे लावल्याने तालुक्यातील इतर जमीन थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत.
तालुक्यात कोळसा खाणींनी बराचसा भाग व्यापाला आहे. यात चांगल्या दर्जाचा कोळसा साफ करण्याचे काम कोल वॉशरीजकडून केले जात आहे. तालुक्यात चार ते पाच कोल वॉशरीज आहेत. यात काही कोल वॉशरीजमध्ये काम सुरु आहे. तर काही बंद आहे. परंतु, शासनाच्या ज्या जमिनी वॉशरीजने अधिग्रहीत केल्या आहेत. त्या जमिनीचा महसूल अनेक वर्षांपासून थकीत आहे. अशा थकबाकीदारांवर राजुरा महसूल विभागाने कारवाई करणे सुरू केले. गोवरी येथील साझा क्रमांक १४ मधील एकूण आराजी २७.८४ हेक्टर आर. क्षेत्रात मागील एक वर्षापासून जमीन महसूल वसुलीचे एक लाख ८९ हजार ४५० रुपये थकीत आहे. परिणामी, महसूल कार्यालयाकडून थकबाकी जमा करण्याकरिता गुप्ता कोल वाशरीजला नमूना १ व नमूना २ मध्ये नोटीस दिली होती. कंपनीने थकबाकी रक्कमेचा भरणा न केल्यामुळे सोमवारी तहसीलदार डॉ. होळी, मंडळ अधिकारी निरंजन गोरे, तलाठी मारोती अत्रे आदींनी पंचनामा करुन सदर कंपनीला टाळे ठोकला आहे.