मानवता आणि विज्ञान हाच बौद्ध तत्त्वज्ञानाचा मूळ गाभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 10:35 PM2017-10-16T22:35:13+5:302017-10-16T22:36:04+5:30

बौद्ध तत्त्वज्ञानाची प्रासंगिकता जगभरात वाढत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध तत्त्वज्ञानाला आधुनिक जीवनप्रणालीशी जोडून व्यावहारिक पातळीवर आणले.

Humanity and Science are the basic concepts of Buddhist philosophy | मानवता आणि विज्ञान हाच बौद्ध तत्त्वज्ञानाचा मूळ गाभा

मानवता आणि विज्ञान हाच बौद्ध तत्त्वज्ञानाचा मूळ गाभा

googlenewsNext
ठळक मुद्देभदन्त सुरेई ससाई : धम्मचक्र अनुवर्तन सोहळ्यात धम्मप्रवचन

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : बौद्ध तत्त्वज्ञानाची प्रासंगिकता जगभरात वाढत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध तत्त्वज्ञानाला आधुनिक जीवनप्रणालीशी जोडून व्यावहारिक पातळीवर आणले. परिणामी, नवी पिढीदेखील आज बुद्धविचारांकडे आकर्षित झाली. कारण, मानवता आणि विज्ञान हा बौद्ध तत्त्वज्ञानाचा पाया आहे, असे प्रतिपादन भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी केले. ६१ व्या धम्मचक्र अनुप्रर्वतन सोहळ्यातील धम्मप्रवचन या सत्रात सोमवारी प्रमुख मार्गदर्शक बोलत होते.
यावेळी भदंत धम्मसारथी, भदंत बोधिरत्न, भदंत नागाघोष, भदंत नागवंश, भदंत ताझनिया, भदंत झोटीलो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर, मारोतराव खोब्रागडे, वामन मोडक, अशोक घोटेकर, प्रा. संजय बेले व अन्य मान्यवर उपस्थित होते. भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई म्हणाले, बौद्ध तत्त्वज्ञानाने मानवाच्या प्रश्नांचा विचार केला.
स्वर्ग, नरक, आत्मा, परमात्मा आदी दैववादी संकल्पना नाकारून विज्ञानाची कास धरली. मानवाने निर्माण केलेले प्रश्न मानवच सोडवू शकतो. त्यासाठी कुण्या दैवीशक्तीची गरज नाही, हा विचार विवेकी मनाला पटणारा असल्याने जगभरात धम्म अनुयायांची संख्या वाढत आहे.
परंतु, मूळ बौद्ध विचारात शिरलेल्या विघातक प्रवृत्तींचा तात्त्विक विरोध करून धम्म चळवळीत सर्वसामान्य व्यक्तिला सामावून घेण्यासाठी आता काळानुसार सामूहिक प्रयत्नांची गरज आहे, याकडेही भदंत सुरई ससाई यांनी लक्ष वेधले.
बोधिरत्न यांनी धम्म विचाराची मौलिकता विषद केली. भदंत नागाप्रकाश यांनी बुद्ध तत्त्वज्ञान आणि आचरण या पैलूवर भाष्य केले. भदंत नागवंश यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतरामागील ऐतिहासिकता मांडली. प्रारंभी अरुण घोटेकर यांनी मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. सामूहिक बुद्ध वंदनेनंतर धम्मप्रवचन सत्राचा समारोप झाला.
प्रथमोपचार केंद्र
जिवक आरोग्य केंद्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने दीक्षाभूमी परिसरात प्रथमोपचार केंद्राचा स्टॉल लावण्यात आले होते. यावेळी डॉ. राजेश कामडी हे आलेल्या बौद्ध बांधवाची समस्या जाणून त्यावर प्रथमोपचार करीत होते. दोन दिवसांत सुमारे तीन हजारच्या जवळपास नागरिकांवर प्रथमोपचार करण्यात आले.
युवकांनी केला पथनाट्यातून जागर
दीक्षाभूमीवर मैत्री व करुणेचा धम्मसंदेश देण्याचे कार्य तरुणाच्या एका जत्थ्याने पथनाट्याच्या माध्यमातून केले. दीक्षाभूमीवर ये-जा करणारे बौद्धबांधव या पथनाट्याकडे आकर्षीले जात होते. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व तथागत बुद्धाचा संदेश प्रसारीत करीत होते.
पाचशे पोलिसांचा ताफा
डॉ. आंबेडकरांच्या पावन पदस्पर्शाने पवित्र झालेल्या दीक्षाभूमीवर जिल्ह्यातूनच नाहीतर विदर्भातील असंख्य बौद्ध बांधव डॉ. आंबेडकरांना मानवंदना देण्यासाठी दीक्षाभूमीवर उपस्थित होते. त्यामुळे पवित्र स्थळावर कुठलीही अनुचीत घटना घडू नये म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंग राजपूत यांच्या नेतृत्वात पोलिसांचा ताफा दीक्षाभूमीवर सज्य होता. यामध्ये एसडीपीओ सुशिल कुमार नायक, यांच्यासमवेत सात पोलीस निरिक्षक, ४१ सहाय्यक पोलीस निरिक्षक यांच्यासमवेत ४५० महिला व पुरुष पोलीस शिपाई दीक्षाभूमी परिसरात कर्तव्यावर होते. तर त्यासोबतच जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर व अप्पर पोलीस अधीक्षक हेमराज सिंग राजपूत वेळोवेळी पोलिसांची संपर्क करुन परिस्थितीची माहिती घेत होते.
पुस्तकविक्रीचा उच्चांक
चंद्रपूर: दीक्षाभूमीवर धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी विदर्भातील अनेक जिल्ह्यांतील बौद्ध बांधव उपस्थित झाल्याने यंदा पुस्तकविक्रीने उच्चांक गाठला. दीक्षाभूमीच्या परिसरात बुकस्टॉल, कॅसेट्स स्टॉल, लहान मुलांच्या खेळणीचे दुकान, बाबासाहेबांच्या प्रतिमा, विक्रीचे दुकान, सिध्दार्थ गौतम बुध्द प्रतिमांमुळे परिसर गजबजलेला दिसत होता. यात विशेष आकर्षक होते ते बाबा साहेबलिखित ग्रंथ. यंदा संविधान, धम्मग्रंथ, मिलिंद प्रश्न व अस्पृश्य मूळचे कोण, या पुस्तकांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. मागील दहा वर्षांपासून बुक स्टॉल लावणारे शिशुपाल गजभिये यांनी यंदाच्या पुस्तक विक्रीबाबत समाधान व्यक्त केले. पंधराशे रूपयांत बाबासाहेब लिखित पुस्तकांचे २० संच पोहचविण्यासाठी अकरा वर्षांपासून चंद्रपूर नगरीत येत आहेत. बाबासाहेबांचे ग्रंथ कमी किमतीत सामान्य जनतेपर्यंत पोहचवत आहे, अशी माहिती विक्रेते प्रदिप रोडगे यांनी दिली. गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी पुस्तकविक्री समाधानकारक असल्याचे गौतम कांबळे यांनी सांगितले. विशेष म्हणजे युवकांनी मोठ्या प्रमाणात ग्रंथ खरेदी केल्याचे दिसून आले.
बेरोजगारांसाठी मार्गदर्शन केंद्र
युवकांना योग्य मार्गदर्शन मिळावे, त्यांचे भविष्य उज्वल व्हावे, यासाठी एआयएम व नीसेसच्या वतीने सुशिक्षित बेरोजगारांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी विशेष स्टॉल लावण्यात आले होते. यावेळी युवकांची शैक्षणिक पात्रता विचारुन त्यांना योग्य मार्गदर्शन देण्यात येत होते. दोन दिवसांमध्ये सुमारे ८०० युवकांनी तज्ज्ञांकडून स्वयंरोजगाचे मार्गदर्शन घेतले.
जनजागृतीपर कार्यक्रम
दीक्षाभूमी परिसरात अनेक ठिकाणी वेगवेगळे स्टॉल लावण्यात आले होते. त्यामध्ये बीआरएसपीच्या वतीने बुद्ध-भीम गितांवर प्रबोधनात्मक कार्यक्रम पार पडला. तसेच प्रबोधन कला मंचच्या माध्यमातून जनजागृती कार्यक्रम पार पडला.
आरोग्य तपासणी केंद्र
दीक्षाभूमीवर आलेल्या बौद्ध बांधवांच्या आरोग्य तपासणी करण्यासाठी विविध सामाजिक व सेवाभावी संस्थांकडून आरोग्य तपासणीचे स्टॉल लावण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून हत्तीरोग व हिवताप तपासणी करण्यात येत होती. त्याचबरोबर अनेक खासगी संस्थांनीही मोफत तपासणी आरोग्य तपासणी केली. आरोग्याबाबत काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

Web Title: Humanity and Science are the basic concepts of Buddhist philosophy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.