जवाहर नवोदय विद्यालय बनले समस्याचे माहेरघर
By Admin | Published: July 17, 2014 12:00 AM2014-07-17T00:00:16+5:302014-07-17T00:00:16+5:30
हुशार, होतकरु, प्रतिभावान विद्यार्थ्यांना उच्च प्रतिचे शिक्षण मिळावे, यासाठी केंद्रशासनाकडून चालविल्या जाणाऱ्या तळोधी येथील जवाहर नवोदय विद्यालय समस्याचे माहेरघर बनले असले आहे.
नवरगाव : हुशार, होतकरु, प्रतिभावान विद्यार्थ्यांना उच्च प्रतिचे शिक्षण मिळावे, यासाठी केंद्रशासनाकडून चालविल्या जाणाऱ्या तळोधी येथील जवाहर नवोदय विद्यालय समस्याचे माहेरघर बनले असले आहे. विद्यार्थ्यांना निकृष्ट भोजन, शुद्ध पाण्याचा अभाव, यामुळे विद्यार्थ्यांच्या आयोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत पालकांनी केला असून संबंधितावर कारवाईची मागणी केली आहे.
केंद्र शासनाने हुशार होतकरु प्रतिभावान विद्यार्थ्यांना उच्च प्रतिचे शिक्षण मिळावे, यासाठी सर्व सोईयुक्त प्रत्येक जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालयाची निर्मिती केली. त्यात विद्यार्थ्यांना उत्कृष्ट पोषण आहार, स्वच्छ पाणी, गणवेश, ताजी फळे, साबूण, आणि मुलांच्या आरोग्य तपासणीकरिता नर्स, उच्चप्रतिचे शिक्षण आदी सोयीसुविधा पुरविण्यासाठी १६ फेब्रुवारी २०१२ च्या दरवाढीच्या पत्रकानुसार प्रति विद्यार्थी प्रति महिना मेस खर्च म्हणून बाराशे रुपये, गणवेश २ हजार रुपये नोटबुक ४०० रुपये दैनंदिन वापराच्या वस्तुसाठी एक हजार रुपये दिले जातात. परंतु तळोधी येथील जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांना व्यवस्थापनाकडून निकृष्ठ दर्जाचे भोजन, त्यात कडक पोळ्या, दरवर्षी दोन गणवेश देण्याचा नियम असताना वेळेवर गणवेश दिले जात नाहीत. विद्यार्थी निवासाच्या ठिकाणी पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे शौचालय- बाथरुममध्ये दुर्गंधी पसरली आहे. पुरेशे पाणी मिळत नसल्याने विद्यार्थी चार- चार दिवस आंघोळ करीत नसल्याचे पालकांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. वर्षाभरापासून पीटीसी सभा घेण्यात आल्या नाही. शाळा परिसरातील कचऱ्याची साफसफाई, शौचालय, बाधरुमची साफसफाई विद्यार्थ्यांकडून केली जाते.
विद्यालयात शिस्त नसल्यामुळे विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्यांच्या सामानाची चोरी करतात. तसेच रॅगींग, मोबाईलचा सर्रास वापर नियमात नसतानाही होत आहे. याकडेही व्यवस्थापनाचे लक्ष नाही.
पालकाकडून पीटीसी फंडात ९० हजार पेक्षा जास्त निधी गोळा करुनसुद्धा भौतिक सुविधेवर खर्च केला जात नाही. अशा नानाविध समस्या असताना सदर समस्येबाबत विद्यार्थ्यांनी कुठे वाच्यता केल्यास त्यांना धमकावून शारिरीक मानसिक छळ करुन शिक्षेचा वापर करुन शाळेतून काढण्याची धमकी दिली जाते. पालकासोबत तेथील कर्मचारी उद्धटपणाने वागत असल्याचा आरोप पत्रपरिषदेत डॉ. रोहिणी खोब्रागडे व राजेश बोरकर यांनी केला असून सदर आशयाचे निवेदन ६३ पालकांच्या स्वाक्षरीनीशी जनशिकायत नवोदय विद्यालय समिती दिल्लीकडे दिले आहे. (वार्ताहर)