राहुल गांधींच्या 'खास मित्रा'ला हरवणारा 'जायंट किलर' चंद्रपूरचा जावई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 10:07 AM2019-05-25T10:07:04+5:302019-05-25T10:07:41+5:30
चंद्रपूरच्या जनता महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक भाऊराव जांभूळकर व शालिनीताई यांचे जावई डॉ. के. पी.यादव यांनी देशाच्या राजकारणातील काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूरच्या वडगाव प्रभागातील रहिवासी जनता महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक भाऊराव जांभूळकर व शालिनीताई (शिक्षणमहर्षी श्रीहरी जिवतोडे गुरुजींची कन्या) यांचे जावई डॉ. के. पी.यादव यांनी देशाच्या राजकारणातील काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव केला आहे.
यापूर्वी झालेल्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत केवळ दोन हजार मतांनी पराभव झाल्यानंतर भाजपने यादव यांना गुना मतदार संघातून लोकसभेची उमेदवारी दिली. विशेष म्हणजे एकेकाळी त्यांच्या कुटुंबाचे माधवराव शिंदे यांचे घराण्याशी अतिशय घनिष्ठ संबंध होते.
डॉ. के.पी. यादव यांच्या पत्नी डॉ. अनुराधा यादव यांचा जन्म चंद्रपुरातला. त्यांचे वैद्यकीय शिक्षण नागपुरात झाले. येथेच त्यांची व डॉ. के.पी. यादव यांची ओळख झाली व त्यांचा विवाह झाला. डॉ. यादव यांना राजकारणाची कौटुंबिक पार्श्वभूमी नाही. गुना येथे वास्तव्यास असताना त्यांचा राजकारणात प्रवेश झाला होता.
गुना लोकसभा मतदारसंघात डॉ. के. पी. यादव यांनी ६ लाख १४ हजार ०४९ मतं मिळवत विजय साकारला, तर ज्योतिरादित्य शिंदे यांना ४,८८,५०० मतं मिळाली.