काजीपेठ-पुणे रेल्वेगाडी सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 11:34 PM2017-10-02T23:34:24+5:302017-10-02T23:34:39+5:30
जिल्ह्यातील प्रवाशांना पुण्याला जाणे सोईचे व्हावे, यासाठी काजीपेठ-बल्हारशाह-पुणे ही थेट रेल्वेगाडी दिवाळीपूर्वी सुरू होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: जिल्ह्यातील प्रवाशांना पुण्याला जाणे सोईचे व्हावे, यासाठी काजीपेठ-बल्हारशाह-पुणे ही थेट रेल्वेगाडी दिवाळीपूर्वी सुरू होणार आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी यासंदर्भात पाठपुरावा केला असून त्यामुळे प्रवाशांची समस्या लवकरच दूर होणार आहे.
चंद्रपूर स्थानकावर अनेक सुपरफास्ट एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्यासाठी ना. हंसराज अहीर यांनी प्रयत्न केले होते. मागील काही वर्षांपासून काजीपेठ-बल्लारशाह-पुणे ही थेट रेल्वेगाडी सुरू करण्याची मागणी चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांबरोबरच रेल्वे सुविधा संघटना, संघर्ष समिती व विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी सातत्याने केली होती. त्यामुळे ना. हसराज अहीर यांनी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांची भेट घेऊन काजीपेठ-बल्लारशाह-पुणे रेल्वेसेवेचे महत्त्व पटवून दिले. शिवाय, रेल्वे प्रवाशांना दिवाळीची भेट द्यावी अशी मागणी केली. या मागणीबरोबर ना. अहीर यांनी लोकसभा क्षेत्रातील रेल्वेच्या विविध समस्यांबाबत रेल्वे मंत्र्यांशी सकारात्मक चर्चा केली.
केंद्रीय रेल्वेमंत्र्यांच्या दालनात २६ सप्टेंबर रोजी झालेल्या या चर्चेत अहवाल व आवश्यक कागदपत्रांची फाईल सादर करण्याचे निर्देश रेल्वे मंत्रालयीन अधिकाºयांना चर्चेदरम्यान दिले आहे.
दरम्यान, काजीपेठ- बल्लारशाह- पुणे ही रेल्वेगाडी सुरू करण्यास रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी होकार दर्शविला. ही गाडी सुरू झाल्यास आंध्र प्रदेश आणि विदर्भाच्या विकासाला चालना मिळेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. या चर्चेत श्रद्धासेतू एक्स्प्रेस (फैजाबाद ते रामेश्वरम) ला चंद्रपूर रेल्वेस्थानकावर थांबा देण्याचा निर्णय तसेच अन्य एक्स्प्रेसबाबतही या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थी पुणे येथे शिक्षण घेण्यासाठी जातात. तसेच व्यापार आणि उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने पुणे शहराशी दिवसेंदिवस संबंध वाढत आहे. मात्र, पुण्यात जाण्यासाठी थेट रेल्वेगाडी नसल्याने संकटांचा सामना करावा लागत होता. रेल्वेमंत्र्यांनी काजीपेठ- बल्लारशाह- पुणे ही गाडी सुरू होण्यास होकार दर्शविल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.