कुष्ठरोगी बांधव समाजातील बेरोजगारांना प्रशिक्षण देणार
By admin | Published: February 10, 2017 12:46 AM2017-02-10T00:46:46+5:302017-02-10T00:46:46+5:30
कुष्ठरोगी बांधवांना कर्मयोगी बाबा आमटे व साधनाताई यांनी सोबत घेवून शून्यातून आनंदवन उभे केले.
विकास आमटे : कर्मयोगी बाबांचा स्मृतीदिन सोहळा
वरोरा : कुष्ठरोगी बांधवांना कर्मयोगी बाबा आमटे व साधनाताई यांनी सोबत घेवून शून्यातून आनंदवन उभे केले. आनंदवनाचे कार्य सातासमुद्रापलीकडे गेले आहे. आजही आनंदवनात विविध प्रकल्प सुरु आहेत. या प्रकल्पाचा लाभ समाजातील बेरोजगारांना व्हावा, याकरिता कुष्ठरोगी बांधव बेरोजगारांना प्रशिक्षण देवून त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मत महारोगी सेवा समिती आनंदवनचे सचिव डॉ. विकास आमटे यांनी व्यक्त केले.
आज गुरुवारी आनंदवन येथील श्रद्धावनातील कर्मयोगी बाबा आमटे यांच्या नवव्या स्मृतीदिनी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कर्मयोगी बाबा आमटे यांच्या नवव्या स्मृतीदिनी श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता आनंदवनातील श्रद्धावन परिसरातील कर्मयोगी बाबा आमटे यांच्या समाधीस्थळाजवळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी ‘माणूस माझे नाव व श्रृखंला पायी असू दे’ हे कर्मयोगी बाबांचे गीत आनंदवनातील विद्यार्थ्यांनी गायल्यानंतर कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. ज्या कुष्ठरोगांना त्या वेळी व आजही समाज स्वीकारत नाही, त्यांना बाबांनी जवळ केले. आनंदवन परिसरात दोन महाविद्यालये, अंध, अपंग, मूकबधीरांना शिक्षण मिळावे म्हणून आपल्या परिश्रमातून शाळा व महाविद्यालयाचे बांधकाम केले. या शाळेमध्ये हजारो युवक- युवती शिक्षण घेत आहेत. कुष्ठरोगापेक्षा भयंकर रोग बेरोजगारी आहे. या बेरोजगारांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे काम यापुढे कुष्ठरोगी बांधव करणार आहे. देशात कुष्ठरोग्यांची संख्या अधिक असल्याने व महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. शासनाने कुष्ठरोग निर्मूलन विभाग आरोग्य विभागाला हस्तांतरण केला आहे. त्यामुळे कुष्ठरोग निर्मूलनाचे कार्य खऱ्या अर्थाने होत नसल्याची खंत डॉ. विकास आमटे यांनी व्यक्त केली. याप्रसंगी डॉ. शितल आमटे यांच्या संकल्पनेतून साकारलेली बाबा आजोबांना पत्र संकल्पना अश्विनी आंधळकर व विशाल झिरे यांनी राबवली. त्यात आनंदवनातील इयत्ता १ ली ते ८ वीमधील ५६ विद्यार्थी सहभागी झाले होते. यात अंध मुलामुलींचा सहभाग होता. यातील २१ विद्यार्थ्यांना याप्रसंगी पारितोषिके देण्यात आली. बाबा आजोबांना पत्र ही संकल्पना राज्यात राबविण्यात येणार आहे. (तालुका प्रतिनिधी)
स्वरानंदवन आॅर्केस्ट्राला परदेशात मागणी
अंध अपंग, कुष्ठरोगी यांचा समावेश असलेला व डॉ. विकास आमटे यांच्या संकल्पनेतून साकारलेला स्वरानंदवन आॅर्केस्ट्राने महाराष्ट्र, गोव्यात अनेक कार्यक्रम केले. आनंदवननिर्मित स्वरानंदवन आर्केस्ट्राला आता अमेरीका, इंग्लड, पाकिस्तान आदी देशात कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले आहे. परंतु आनंदवनाला एकच रेशन कार्ड असल्याने पासपोर्ट कसा मिळणार, असा प्रश्नही अनुत्तरीत आहे. उपस्थितांना डॉ. हरिश्चंद्र सालफळे, प्रा. श्रीकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. भारती आमटे, दत्तोपंत मामीडवार, सुधाकर कडू, डॉ.विजय पोळ, सदाशिव ताजने व आनंदवनातील विभाग प्रमुख, कार्यकर्ते व शाळा महाविद्यालय मुख्याध्यापक, कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन रवींद्र नलगंटीवार यांनी तर भारत जोडो या गिताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.