Lok Sabha Election 2019; ‘त्या’ १४ गावात दोन राज्यांची मतदान केंद्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 03:41 PM2019-04-04T15:41:09+5:302019-04-04T15:41:50+5:30
अनेक मतदार एकाचवेळी दोन्ही राज्यात मतदान करण्यासाठी सज्ज झाले असल्याचा प्रकार महाराष्ट्र - तेलंगणा सीमेवरील वादग्रस्त १४ गावात बघायला मिळत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: निवडणूक आयोगाच्या नियमानुसार एका नागरिकाला एकावेळी एकदाच मतदान करण्याचा अधिकार असल्याचे सांगितले जाते. असे असले अनेक मतदार एकाचवेळी दोन्ही राज्यात मतदान करण्यासाठी सज्ज झाले असल्याचा प्रकार महाराष्ट्र - तेलंगणा सीमेवरील वादग्रस्त १४ गावात बघायला मिळत आहे. या १४ गावात तेलंगणा व महाराष्ट्र या दोन्ही राज्यातील लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्र असणार आहे. विशेष म्हणजे, दोन्ही राज्याची निवडणूक ११ एप्रिललाच होत आहे.
येत्या ११ एप्रिल रोजी लोकसभेच्या पहिल्या टप्प्याकरिता मतदान प्रक्रिया होणार आहे. सीमेवरील वादग्रस्त १४ गावे महाराष्ट्र शासनाचीच असल्याचा महत्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतरही या वादग्रस्त गावात तेलंगणा राज्याची दादागिरी पाहायला मिळते. मागील काही महिन्यांपूर्वी या वादग्रस्त गावात महाराष्ट्र शासनाच्या ग्रामपंचायत व तेलंगणा शासनाच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. आता पुन्हा याच वादग्रस्त गावात दोन्ही राज्याच्या लोकसभा निवडणुका होत आहे. येथील नागरिक मात्र दोन्ही राज्यात मतदान करण्यासाठी सज्ज झाले आहे. लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात या वादग्रस्त गावांमध्ये तेलंगणा शासनाच्या वतीने आसिफाबाद लोकसभेकरिता तर महाराष्ट्र शासनाकडून चंद्रपूर -वणी लोकसभेकरिता मतदान होणार आहे. निवडणूक जशी जवळ येत आहे, तसे या वादग्रस्त गावात प्रचाराचा वेग वाढत चालला आहे. एकाच दिवशी दोन्ही राज्याच्या निवडणुका गावात होणार असल्याने दोन्ही राज्याचे पोलीस बंदोबस्तसुध्दा मोठ्या प्रमाणात आहे.