७१ जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 11:20 PM2018-05-13T23:20:12+5:302018-05-13T23:20:12+5:30
सनई- चौघड्याचे सूर, वऱ्हाड्यांची रेलचेल, फुलांनी सजविलेल्या बसेसमधून लग्नमंडपात आलेले तब्बल ७१ जोडपे, फुलांच्या वर्षावाने त्यांचे झालेले स्वागत, पंचपक्वांनाचे जेवन आणि विविध धर्माच्या रितीरिवाजानुसार एकाच मंडपात पार पडलेला आगळावेगळा विवाह सोहळा शनिवारी चंद्रपूरच्या चांदा क्लब ग्राऊंडवर पार पडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: सनई- चौघड्याचे सूर, वऱ्हाड्यांची रेलचेल, फुलांनी सजविलेल्या बसेसमधून लग्नमंडपात आलेले तब्बल ७१ जोडपे, फुलांच्या वर्षावाने त्यांचे झालेले स्वागत, पंचपक्वांनाचे जेवन आणि विविध धर्माच्या रितीरिवाजानुसार एकाच मंडपात पार पडलेला आगळावेगळा विवाह सोहळा शनिवारी चंद्रपूरच्या चांदा क्लब ग्राऊंडवर पार पडला. या सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या पुढाकारातून करण्यात आले.
राज्याचे धर्मदाय आयुक्त शिवकुमार डिगे यांच्या पुढाकारातून राज्यभरात पहिल्यांदाच जिल्ह्यातील सहायक धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या वतीने सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. गरीब, आत्महत्याग्रस्त शेतकरी, सर्वसामान्य कुटुंबातील मुला-मुलींचे विवाह नि:शुल्क व्हावे आणि त्यांचा खर्च वाचावा, या मागील उदात्त हेतू आहे. विवाह सोहळ्याच्या खर्चाची जबाबदारी जिल्ह्यातील विविध धार्मिक, सामाजिक संघटनांनी उचलावी, यासाठी धर्मदाय कार्यालयाने पुढाकार घेतला.
दरम्यान, धर्मदाय कार्यालयाच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील विविध धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक संघटनांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत या विवाह सोहळ्यात सहभाग घेतला होता. यासाठी आयोजन समिती तयार करण्यात आली. या आयोजन समितीने केलेल्या प्रयत्नातून तब्बल सर्वधर्मातील ७१ जोडप्यांचा या मंडपात विविध धर्माच्या रितीरिवाजानुसार विवाह लावून देण्यात आला. यासाठी विविध धर्माचे धर्मगुरु उपस्थित होते. यावेळी विवाहित जोडप्यांना विविध भेटवस्तू देण्यात आले. डिजेला तिलांजली देत सनई, चौघड्याच्या सुरात हा विवाह सोहळा पार पडला. तत्पूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातून नवरदेव, नवरीची फुलांनी सजविलेल्या बसमधून वरात लग्नमंडपापर्यंत आणण्यात आली आणि शांततेत विवाह सोहळा पार पडला. वºहाड्यांच्या जेवनाची संपूर्ण जबाबदारी सकल जैन समाज संघटनेने घेतली होती.
विवाह सोहळ्याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नितीन बोरकर, सहायक धर्मदाय आयुक्त रामलाल चव्हाण, धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या अधीक्षक रॉय, आयोजन समितीचे अध्यक्ष मनीष महाराज, उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे, सचिव संजयकुमार पेचे, महेश कल्लुरवार, सुधाकर कुंदोजवार, शोभाताई पोटदुखे, सूर्यकांत खनके आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.