न्यूनगंड न बाळगता ध्येयाकडे वाटचाल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 11:13 PM2017-12-27T23:13:16+5:302017-12-27T23:13:49+5:30
अंधश्रद्धेचा परिणाम विद्यार्थ्यांच्या जडणघडण व मानसिकतेवर मोठ्या प्रमाणात होतो. ज्यामुळे विद्यार्थ्यांचे संपूर्ण भावविश्व व भवितव्य नकारात्मकरित्या प्रभावित होते.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : अंधश्रद्धेचा परिणाम विद्यार्थ्यांच्या जडणघडण व मानसिकतेवर मोठ्या प्रमाणात होतो. ज्यामुळे विद्यार्थ्यांचे संपूर्ण भावविश्व व भवितव्य नकारात्मकरित्या प्रभावित होते. परिणामी भितीसोबतच अनेक न्यूनगंडाने विद्यार्थी बळी पडतात. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करताना विद्यार्थ्यांनी मनात कुठलाही न्यूनगंड न बाळगता, ध्येयाकडे वाटचाल करावी यश नक्कीच मिळेल, असे प्रतिपादन मंत्रालयात राजस्व विभागात कार्यरत सहायक आयुक्त नितीश पाथोडे यांनी केले.
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि वासनिक अॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्पर्धा परीक्षा आणि अंधश्रद्धा’ या विषयावर आयोजित व्याख्यानामाध्ये ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अ.भा.अंनिसचे जिल्हा संघटक अनिल दहागावकर, वासनिक अॅकॅडमीचे संचालक संजय वासनिक, प्रा.स्निग्धा सदाफळे, अंनसिचे जिल्हाप्रसिद्धी प्रमुख निलेश पाझारे आदी उपस्थित होते. याप्रसंगी अनिल दहागावकर यांनी विद्यार्थ्यानी जीवनात वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अंगिकार करून सकारात्मरित्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करावा, आणि प्रशासकीय सेवेमध्ये सहभागी होऊन राष्ट्रनिर्माणात योगदान द्यावे, असे विश्वास व्यक्त केले.
यावेळी नितीश पाथाडे यांनी विद्यार्थ्यांनी थेट संवाद साधत स्पर्धा परीक्षांशी संबंधित विविध समस्या, विद्यार्थ्यांना पडणारे प्रश्न, स्वत:चा अनुभव कथन केला. तसेच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्ते दिली. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.