कोरपना तालुुक्यात पैनगंगा नदीवर बॅरेज बंधाऱ्याची गरज
By Admin | Published: November 18, 2014 10:53 PM2014-11-18T22:53:53+5:302014-11-18T22:53:53+5:30
शेतकऱ्यांच्या शेतीला सिंचनासाठी वरदान ठरणाऱ्या ‘निम्म पैनगंगा प्रकल्पाचे काम मार्गी लागले आहे. महाराष्ट्र व तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा असलेला प्रकल्प आहे.
वनसडी : शेतकऱ्यांच्या शेतीला सिंचनासाठी वरदान ठरणाऱ्या ‘निम्म पैनगंगा प्रकल्पाचे काम मार्गी लागले आहे. महाराष्ट्र व तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा असलेला प्रकल्प आहे. या प्रकल्पाचा हेतू साध्य ठरण्यासाठी कोरपना तालुक्यात पैनगंगा नदीवर बॅरेज बंधारे बांधण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
कोरपना तालुक्यातील परसोडा व चंद्रपूर तालुक्यातील वढा गावाजवळ बॅरेज बंधारे बांधण्यात आल्यास याचा उपयोग येथील शेतकऱ्यांना होणार आहे. दोन दिवसांपूर्वी तेलंगणातील जैनथ मंडलच्या ‘गिम्मा’ गावात तेथील प्रशासनाने बैठक घेऊन बॅरेज बंधाऱ्यासाठी शेतकऱ्यांची अनुमती मिळविली. तेथील शेतकरी यासाठी सकारात्मक आहे. हा भाग कोरपना तालुक्याला लागून आहे. पैनगंगा नदीदेखील तेथूनच वाहते. पुढे ती कोरपना तालुक्यात प्रवाहीत होते. पाण्याच्या नियोजनाच्या दृष्टिकोनातून या भागातही बॅरेज बंधारे बांधण्यात यावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून येथील शेतकऱ्यांकडून होत आहे. या भागात या दृष्टीने सर्व्हेक्षणही करण्यात आले आहे. मात्र या निर्मिती संदर्भात कोणत्याच सरकारकडून हालचाली होत नसल्याने काम रखडले आहे. या क्षेत्रातील कोरपना, राजुरा, वणी, चंद्रपूर, झरी तालुक्याअंतर्गत गावातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. तालुक्यातील ४० हजारापर्यंतचे धारणा क्षेत्र ओलीताखाली येऊ शकेल. याचा सर्वस्वी लाभ शेतकरी व नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा होईल. सध्या केंद्रात व राज्यात एकच शासन असल्याने मंजुरी मिळण्यास कुठलीच अडचण जाणार नाही. या दृष्टिकोनातून शासनस्तरावर गतीमान हालचाली होणे गरजेचे आहे. यासाठी सिंचन विभाग व लोकप्रतिनिधी यांच्या प्रचंड इच्छाशक्तीची गरज आहे. येथे त्वरित बॅरेज बंधाऱ्याविषयीच्या निर्मितीसाठी पाऊले उचलण्यात यावी, अशी मागणी आहे. (वार्ताहर)