बल्लारशाहतून नवीन रेल्वे सुरू होण्याचा मार्ग मोकळा; ३ जुलै रोजी होणार चाचणी
By साईनाथ कुचनकार | Published: June 28, 2023 03:42 PM2023-06-28T15:42:08+5:302023-06-28T15:44:28+5:30
रेल्वे स्थानकावरील पिटलाइनचे का पूर्ण
चंद्रपूर : मागील चार वर्षांपासून बांधकाम सुरू असलेल्या बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील पिटलाइनचे काम आता जवळपास पूर्ण झाले आहे. येत्या ३ जुलै रोजी संबंधित अधिकाऱ्यांकडून त्याची चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानंतर ही पिटलाइन रेल्वे प्रशासनाकडे हस्तांतरित होताच या स्थानकातून विविध रेल्वे गाड्या सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून लांब पल्ल्याच्या रेल्वेच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
७ मार्च २०१९ रोजी ओबीसी आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी पुढाकार घेत शासनाकडून ११.१५ रुपये मंजूर करून २६ बोगींच्या पिटलाइनच्या कामाचा शुभारंभ केला होता. दरम्यानच्या काळात कोरोना संकटामुळे या कामाला विलंब झाला. कामाच्या विलंबामुळे माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, झेडआरयूसीसी सदस्य दामोदर मंत्री, श्रीनिवास सुंचूवार, डीआरयूसीसी सदस्य विकास राजूरकर यांनी वेळोवेळी पिटलाइनच्या कामाची पाहणी करून संबंधितांना काम त्वरित करण्यासंदर्भात सूचना दिल्या. सततचा पत्रव्यवहार आणि प्रयत्नांमुळे अखेर पिटलाइनचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. या कामाची एमएनटीद्वारे चाचणी होणार आहे. यासाठी ३ जुलै रोजी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
पिटलाइन सुरू होताच येथून मुंबईसाठी थेट रेल्वेही लवकरच सुरू होईल, अशी आशा झेडआरयूसीसी सदस्य दामोदर मंत्री, श्रीनिवास सुंचूवार, डीआरयूसीसी सदस्य विकास राजूरकर यांनी व्यक्त केली.
मध्य भारतातील महत्त्वाचे स्टेशन
बल्लारशाह रेल्वे स्टेशन हे मध्य भारतातील एक प्रमुख रेल्वे जंक्शन आहे. या रेल्वे स्थानकावर मध्य रेल्वे, दक्षिण मध्य रेल्वे, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे झोनचा त्रिवेणी संगम आहे. या स्थानकातून चंद्रपूर, गडचिरोली, तेलंगणा सीमावर्ती भागातील प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता येथे पिटलाइन सुरू करण्यात येणार आहे.
बल्लारशा रेल्वे स्थानकावर पिटलाइन सुरू करण्यासंदर्भात रेल्वे प्रशासनाकडे मागील अनेक वर्षांपासून पत्रव्यवहार सुरू होता. दरम्यान, कोरोना संकट काळानंतर येथून थेट मुंबईला जाणारी सेवाग्राम ही एकमेव ट्रेनही बंद करण्यात आली. परिणामी, प्रवाशांना मुंबईला जाणे तसेच मुंबई येथून चंद्रपूरला येणे कठीण झाले आहे. या पिटलाइनचे काम आता पूर्ण झाले असून, लवकरच येथून नवीन रेल्वे सुरू होतील, अशी आशा आहे.
- श्रीनिवास सुंचूवार, झेडआरयूसीसी सदस्य, मध्य रेल्वे