जंगल छावणी चेकपोस्ट रस्त्याची दयनीय अवस्था
By admin | Published: July 26, 2016 01:06 AM2016-07-26T01:06:57+5:302016-07-26T01:06:57+5:30
वेकोलि लालपेठ क्षेत्र चंद्रपूर ग्रा.पं. नांदगाव (पोडे) अंतर्गत असून जंगल छावणी वस्ती चेकपोस्ट ते हनुमान मंदिरपर्यंत रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.
वसाहतीमध्ये चिखलाचे साम्राज्य : वेकोलिने लक्ष देण्याची मागणी
कोठारी : वेकोलि लालपेठ क्षेत्र चंद्रपूर ग्रा.पं. नांदगाव (पोडे) अंतर्गत असून जंगल छावणी वस्ती चेकपोस्ट ते हनुमान मंदिरपर्यंत रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. वेकोलिने या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी. तसेच रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी नांदगाव (पोडे) येथील उपसरपंच मल्लेश कोडारी यांच्यासह गावकऱ्यांनी केली आहे.
जंगल छावणी वस्ती, चेकपोस्ट ते हनुमान मंदिरपर्यंतचा रस्ता ठिकठिकाणी उखडलेला आहे. या रस्त्यावरुन गावकरी, शाळकरी मुलांचे जाणे-येणे असते. दैनावस्थेमुळे रस्त्यावरुन वाहतूक करताना अनेक दुचाकीचालकांचा अपघात होवून जीवही गमवावा लागत आहे. वेकोलिचे कामगार याच रस्त्यावरुन दिवस- रात्र कर्तव्यासाठी ये-जा करीत असतात. त्यांनाही जीव मुठीत घेवून या रस्त्यावरुन नाईलाजास्तव जाणे-येणे करावे लागते. या रस्त्याची देखभाल व दुरुस्ती करण्याचे काम वेकोलि लालपेठ क्षेत्राचे आहे. त्याकरिता त्यांना ग्रामपंचायतीद्वारे ग्रामस्थांचे निवेदन देवून विनंती करण्यात आली होती. मात्र त्याकडे वेकोलि उपप्रबंधक जाणीवपूवक दुर्लक्ष करीत आहेत.
त्याचप्रमाणे गेल्या पंधरा वर्षापासून बीसीडी टाईप वसाहत मायनर्स वसाहतीमधील नाली सफाई, नाली दुरुस्ती तसेच कचराकुंडीची व्यवस्था योग्यरित्या करण्यात आलेली नाही. त्यामुळे े वसाहतीत सर्वत्र दुर्गंधी पसरली असून वसाहतवासीयांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. याबाबतही ग्रामपंचायतीने वेकोलिच्या उपप्रबंधकांना अवगत करुन निवेदन दिले होते.
वेकोलि लालपेठ क्षेत्र चंद्रपूरची वसाहत नांदगाव (पोडे) ग्रामपंचायतीच्या हद्दीत असून ग्रामपंचायतीला वेकोलिकडून कर रुपात ४९ टक्केच कर देण्यात येतो व उर्वरित कर वसाहतीतील नाल्या, दिवाबत्ती, पाणी, कचराकुंडी व सफाईसाठी वेकोलि प्रशासन खर्च करते.
मात्र कर स्वरुपात ग्रामपंचायतीला देण्यात न येणाऱ्या निधीतून वेकोलिने कुठलेही काम व सफाई केल्याचे दिसून येत नाही. वेकोलिने वरील समस्यांचे त्वरित निवारण करीत रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी उपसरपंच मल्लेश कोडारी यांनी केली आहे. (वार्ताहर)
आंदोलनाचा इशारा
वेकोलिने वसाहतीमधील समस्यांची त्वरित सोडवणूक न केल्यास व जंगल छावणी, चेक पोस्ट ते हनुमान मंदिर रस्त्याची डागडुजी करुन रस्ता रुंदीकरण न केल्यास, वेकोलिविरोधात गावकरी तिव्र आंदोलन छेडेल, असा इशारा नांदगाव (पोडे) उपसरपंच मल्लेश कोडारी यांनी दिला आहे.