प्रेमप्रकरण पोहोचले पंचायतीत मात्र कमी वयामुळे लग्न टळले
By admin | Published: June 4, 2016 12:45 AM2016-06-04T00:45:22+5:302016-06-04T00:45:22+5:30
महाविद्यालयीन शिक्षण घेताना सूत जुळले. मात्र काही दिवसांनी घरच्यांसमोर या प्रकरणाचा भांडाफोड झाला.
शासनाचा आदेश कायम : प्रेमीयुगूल झाले नाराज
गोंडपिपरी : महाविद्यालयीन शिक्षण घेताना सूत जुळले. मात्र काही दिवसांनी घरच्यांसमोर या प्रकरणाचा भांडाफोड झाला. त्यामुळे दोघांनाही लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नासाठी गाव पंचायत बोलाविण्यात आली. मात्र प्रियकर व प्रेयसी दोघेही अल्पवयीन असल्याने पुढचे शिक्षण घ्या, असा निर्णय पंचायतीने दिल्याने दोघांचाही हिरमोड झाल्याचा प्रकार गोंडपिपरी तालुक्यातील चेकलिखितवाडा येथे बुधवारी घडला.
गोंडपिपरी तालुक्यातील चेकलिखितवाडा येथील एका युवतीचे वढोली येथील युवकाशी महाविद्यालयीन शिक्षण घेताना सुत जुळले. ते दोघेही गोंडपिपरी येथे शिक्षण घेत होते. कॉलेजच्या निमित्ताने त्यांच्या नियमित भेटीगाठी सुरू होत्या. ते पुढील आयुष्याचे स्वप्न रंगवू लागले. मात्र एक दिवस ‘त्या’ युवतीचा मोबाईल तिच्या आई-वडिलांच्या हाती लागला. मोबाईल कुणाचा, कुठून आला असे विविध प्रश्न विचारून, यापुढे हा सर्व प्रकार बंद कर, असा दम दिला. मात्र पे्रमाचा विरह तिला सहन होईना. तिने घडलेल्या सर्व प्रकरणाची माहिती आपल्या प्रियकराला दिली. आताच्या आता लग्न कर अन्यथा जीवाचे बरेवाईट करील, असा संदेश त्याला मोबाईलवरून पाठविला. तो वाचून प्रियकरालाही काय करावे, काय नाही हे सुचेना. त्याने हिंमत करून सर्व प्रकार आपल्या घरच्यांना सांगितला. कुटुंबीयांनी प्रकरण गावपुढाऱ्यांसमोर मांडले. तंटामुक्त समितीच्या पदाधिकाऱ्यांनाही माहिती देण्यात आली. वढोली तंटामुक्त समितीच्या पदाधिकाऱ्यांनी लग्नासाठी पुढाकार घेऊन प्रियकर व त्याच्या आईवडिलासह बुधवारी चेकलिखितवाडा येथील प्रेयसीचे घर गाठले. चेकलिखितवाडा येथील तंटामुक्त समितीच्या पदाधिकाऱ्यांनाही बोलाविण्यात आले. दोन्ही गावातील तंटामुक्त समितीच्या पदाधिकाऱ्यांत बराच वेळ चर्चा झाली. शासनाचा नियम समोर करीत दोघांचेही लग्नासाठी असणारे वय तपासण्यात आले. मात्र दोघांचेही वय कमी असल्याने लग्न करून देण्यास तंटामुक्त समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नकार दिला. (शहर प्रतिनिधी)