रस्ते झाले; तरच खेड्यांचा विकास !
By admin | Published: January 9, 2017 12:33 AM2017-01-09T00:33:32+5:302017-01-09T00:33:32+5:30
भारत कृषीप्रधान देश आहे. भारतात साडेसहा हजार खेडी आहेत. या खेड्यांचा विकास करावयाचा असेल तर रस्त्याची निर्मिती व्हायला पाहिजे.
नितीन गडकरी यांचे प्रतिपादन : नागभीड येथे जाहीर सभा; कार्यकर्त्यांसह नागरिकांचीही भरगच्च उपस्थिती
घनश्याम नवघडे नागभीड
भारत कृषीप्रधान देश आहे. भारतात साडेसहा हजार खेडी आहेत. या खेड्यांचा विकास करावयाचा असेल तर रस्त्याची निर्मिती व्हायला पाहिजे. काँग्रेस शासनाने ७० हजार कोटी रुपयांची विमाने खरेदी केली. पण रस्ते केले नाही. मात्र अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून सर्वप्रथम रस्त्याचे काम हाती घेण्यात आले व देशाचा विकास साध्य करण्यात आला, असे विचार केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
येथील रेल्वे ग्राऊंडवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने कार्यकर्ता मेळावा आणि जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. ते बोलताना पुढे म्हणाले, केंद्र शासनाने देशात अनेक महामार्ग निर्माण करण्याची योजना आखली आहे. या महामार्गात जे जे पूल बांधण्यात येतील, ते पूल पूल वजा बंधारे असतील. या बंधाऱ्यात पाणी साठविले जाईल आणि त्याचे नियोजन करुन ते पाणी शेतीला दिले जाईल. यामुळे शेतकऱ्यांना आपसुकच सिंचनाची सोय उपलब्ध होईल. या भागात कुटार, गवळा, तुराट्या मोठ्या प्रमाणावर तयार होतो. यापासून इथेनॉल नावाचे इंधन निर्माण होते. त्याची निर्मिती या भागात करण्याचा आमचा विचार आहे. यातूनही शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो, असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी व्यासपिठावर वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, खासदार अशोक नेते, विधानपरिषद सदस्य नितेश भांगडिया, माजी मंत्री संजय देवतळे, माजी आमदार अतुल देशकर, प्रदेश भाजपचे संघटक रविंद्र भुसारी, जिल्हा भाजपाचे अध्यक्ष हरिश शर्मा, जि.प.च्या उपाध्यक्षा कल्पना बोरकर, जि.प. सभापती ईश्वर मेश्राम, चिमूरच्या नगराध्यक्ष शिल्पा राचलवार, भाजप नेते वसंत वारजूकर, भाजपाचे जिल्हा महामंत्री संजय गजपुरे, अवेश पठाण, सचिन आकुलवार, गणेश तर्वेकर, जुनेद खान, प्रदीप तर्वेकर यांची उपस्थिती होती.
यावेळी गडकरी यांच्या हस्ते जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष अॅड. दिगंबर गुरुपुडे, मनोहर देशमुख, मुकुंदा बोरकर, तुकडू गजबे यांना भाजपात प्रवेश देण्यात आला. यानंतर जिल्हा भाजपाचे अध्यक्ष हरिश शर्मा, प्रा. अतुल देशकर, खासदार अशोक नेते, विधानपरिषद सदस्य मितेश भांगडिया यांचे समयोचित भाषणे झाली.
मेळाव्याचे आयोजक किर्तीकुमार भांगडिया यांचेही मुख्य मार्गदर्शन झाले. ते म्हणाले, चिमूर विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी ना. नितीन गडकरी यांनी मोठ्या प्रमाणावर मदत केली. शिवनाल्याच्या रुपाने नागभीड तालुक्यातील ४२ गावांच्या सिंचनाचा प्रश्न निकालात निघणार आहे. उमरेड-नागभीड-आरमोरी या राष्ट्रीय महामार्गासाठी ना. गडकरी यांनीच पुढाकार घेवून महामार्गाचा प्रश्न निकाली काढला. संचालन रेणूका देशकर यांनी तर आभार प्रदर्शन संजय गजपुरे यांनी केले. कार्यक्रमात नागभीड, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, चिमूर, सावली व जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
सर्वच मंत्र्यांची दांडी
कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुडे येणार असे जाहीर करण्यात आले होते. पण यापैकी कोणीच आले नाही.
नागर देऊन सत्कार
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नावाचा अनेकदा उल्लेख केला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचेही नाव कार्यक्रमादरम्यान चर्चेत राहिले. कार्यक्रम स्थळी भाजपाच्या वतीने नितीन गडकरी यांचा नागर देवून सत्कार करण्यात आला.
पाथोडे- निनावे यांची आठवण
या भागात भाजपला सामान्य जनतेपर्यंत पोहविण्यात मोठे कष्ट उपसलेले या भागातील भाजपचे जनक दिवंगत वासुदेवराव पाथोडे, स्व. आेंकार निनावे व काशिनाथ येरणे यांच्या नावाचा ना. गडकरी यांनी प्रारंभीच उल्लेख केला.