महापारेषण कंपनीतील सुरक्षा रक्षक सहा महिन्यांपासून वेतनाविना
By Admin | Published: March 30, 2016 01:29 AM2016-03-30T01:29:46+5:302016-03-30T01:29:46+5:30
महाराष्ट्र राज्य विद्युत महापारेषण कंपनीमध्ये संपूर्ण जिल्ह्यात सुमारे २०० सुरक्षा रक्षकांचे मागील सहा महिन्यांपासून वेतन थकीत ठेवण्यात आले आहे.
कामगार आयुक्तांना निवेदन : वेतन न दिल्यास भाकपातर्फे आंदोलन
भद्रावती : महाराष्ट्र राज्य विद्युत महापारेषण कंपनीमध्ये संपूर्ण जिल्ह्यात सुमारे २०० सुरक्षा रक्षकांचे मागील सहा महिन्यांपासून वेतन थकीत ठेवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची पाळी आली असून थकीत वेतन त्वरीत देण्यात यावे, अन्यथा भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाकपा जिल्हा सहसचिव राजू गैनवार यांनी दिला आहे. चंद्रपूर येथील सहायक कामगार आयुक्त त्यांनी याबाबत निवेदन दिले आहे.
जिल्ह्यातील सुरक्षा रक्षकांचे सहा महिन्यापासूनचे वेतन थकीत असून साप्ताहिक रजासुद्धा दिली जात नाही. शासकीय नियमानुसार वेतन स्लिप व पीएफ द्यायला पाहिजे. पण ते सुद्धा दिल्या जात नाही. या सुरक्षा रक्षकामध्ये प्रामुख्याने सुरेश भडके, प्रकाश पेंदोर, नितेश कष्टी, अरुण ढिंगने, विजय देठे, योगेश देठे, प्रशांत नाईक, संतोष गावंडे, नरेंद्र नारशेट्टीवार, अनिल मिलमिले, नितेश मेश्राम आणि विलास दाते यांच्यासह अन्य सुरक्षा रक्षकांचा समावेश आहे. सुरक्षा रक्षकांनी कामगार आयुक्त, कंपनीचे कार्यकारी अभियंता, आमदार यांना निवेदन दिली. परंतु, त्याची कुणीच दखल घेतली नाही.
वेतनाअभावी सुरक्षा रक्षकांना आपल्या कुटुंबाचा गाडा हाकणे कठीण झाले असून त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. थकीत वेतन सात दिवसाच्या आत न दिल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा राजू गैनवार यांनी दिला असून याबाबतचे निवेदन केंद्रीयमंत्री हंसराज अहीर, राज्यपाल, मुख्यमंत्री, गृहमंत्री, उर्जामंत्री, कामगार मंत्री, पालकमंत्री यांना देण्यात आले आहे. याची दखल घेण्याची मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)