शांतीकुंज, पृथ्वी फेरो अलॉय कंपनीला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 01:05 AM2018-05-09T01:05:27+5:302018-05-09T01:05:27+5:30
येथून पाच किमी अंतरावर असलेल्या मरेगाव येथील शांतीकुंज साल्वंट लि. आणि औद्योगिक परिसरात असलेल्या पृथ्वी फेरो अलॉय प्रा. लि. या दोन कंपनीला मंगळवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास भीषण आग लागली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : येथून पाच किमी अंतरावर असलेल्या मरेगाव येथील शांतीकुंज साल्वंट लि. आणि औद्योगिक परिसरात असलेल्या पृथ्वी फेरो अलॉय प्रा. लि. या दोन कंपनीला मंगळवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत दोन्ही कंपन्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. पाच तासानंतर ही आग आटोक्यात आली.
या दोन्ही कंपन्या बंद अवस्थेत आहेत. मात्र दोन्ही कंपन्यांमध्ये रासायनिक तेल असल्यामुळे आगीने उग्ररूप धारण केले. या दोन्ही कंपनीच्या परिसरात मरेगाव वसलेले आहे. आग आटोक्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला. शेतातील कचरा जाळण्याच्या घटनेमुळे ही आग लागल्याचे बोलल्या जात आहे. खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतात मशागतीचे कामे सुरू आहे. शेतातील कचरा जाळण्यात आल्यानंतर ही आग पसरत कंपनीला आग लागली.
या आगीत कंपनीतील आईल टँक आणि तांत्रिक साहित्य असलेली इमारत जळून खाक झाली. आईल टँकमध्ये सल्फर आॅक्याईड होते. त्यामुळे आगीने उग्ररूप धारण केले. पृथ्वी फेरो अलॉय कंपनीला लागलेल्या आगीत कोळसा, आईल ड्रम, गनी बॅग, वॉटर केमीकल आणि टॉन्सफॉर्मर मोटार जळाली. त्यामुळे या कंपनीचे सुद्धा लाखोंचे नुुकसान झाले.
आग विझविण्यासाठी चंद्रपूर, बल्लारपूर, गडचिरोली आणि मूल येथील अग्निशमन दलाला बोलविण्यात आले. पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
एकोणा येथे दोन घरे जळाली
वरोरा : तालुक्यातील एकोणा गावात अचानक लागलेल्या आगीत दोन घरे जळून खाक झाली. आगीमध्ये घरातील साहित्य, धान्य व रोख रक्कमही जळाल्याने तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. एकोणा येथील धोंडू बुरडकर यांच्या घराला आग लागली. या आगीने शेजारी असलेल्या गोपाळ बुरडकर यांच्याही घराला वेढले. वरोरा येथील अग्नीशामक दलाला पाचारण केल्यानंतर आग आटोक्यात आली. आगीमध्ये दोन्ही घरातील साहित्य, धान्य व रोख रक्कम जळून खाक झाली.