चांदा ते बांदा योजनेतील कामांना वेग द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 12:06 AM2017-10-29T00:06:05+5:302017-10-29T00:06:20+5:30
चंद्रपूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये रिसोर्स बेस्ड इंटेंसिव्ह प्लॅनिंग व डेव्हलपमेंट हा पथदर्शी कार्यक्रम ‘चांदा ते बांदा’ या योजनेअंतर्गत राबविण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये रिसोर्स बेस्ड इंटेंसिव्ह प्लॅनिंग व डेव्हलपमेंट हा पथदर्शी कार्यक्रम ‘चांदा ते बांदा’ या योजनेअंतर्गत राबविण्यात येत आहे. या योजनेतील कामांना वेग द्या आणि ही कामे उत्तमरित्या पूर्ण करताना त्याचा दर्जाही उत्तम राहील याची काळजी घ्या, अशा सूचना वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.
शुक्रवारी सह्याद्री अतिथीगृहात यासंबंधी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी वित्त व नियोजन राज्य मंत्री दीपक केसरकर, नियोजन विभागाचे प्रधान सचिव देबाशिष चक्रवर्ती, वित्त विभागाचे प्रधान सचिव आर. ए. राजीव, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी आशुतोष सलील, सिंधुदूर्गचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
चांदा ते बांदा योजनतील पथदर्शी कार्यक्रम यशस्वी झाल्यानंतर या पॅटर्नप्रमाणे राज्यातील इतर जिल्ह्यांचाही एकात्मिक आणि सर्वांगीण विकास करणार असल्याचे सांगून ना. मुनंगटीवार म्हणाले, या विभागांतर्गत राबविण्यात येणाºया एकात्मिक विकास प्रकल्पांच्या प्रगतीचा अहवाल पुढील बैठकीत सादर करण्यात यावा. योजनेतील कामांचे प्रशासकीय मंजुरीचे अधिकार हे जिल्हाधिकारी यांना आहेत. परंतु त्यांच्या तांत्रिक मंजुरीचे प्रस्ताव हे जिल्हा नियोजन अधिकारी यांनी नियोजन विभागात थेट सादर करावेत. त्या प्रस्तावांना संबंधित विभागाकडून तांत्रिक मंजुरी मिळवून देण्याची प्रक्रिया नियोजन विभागामार्फत समन्वयाने पूर्णत्वाला नेली जाईल. यामुळे प्रस्तावाच्या तांत्रिक मंजुरीसाठी वेळ कमी लागेल, असेही ते म्हणाले.
चंद्रपूर व सिंधुदुर्ग हे महाराष्ट्राच्या दोन टोकांवरील खनिज आणि नैसर्गिक संपत्ती लाभलेले दोन जिल्हे आहेत. या संपत्तीचा अधिकाधिक उपयोग करून जिल्ह्यांचा विकास करताना अधिकाधिक रोजगार निर्माण होऊन त्याचा लाभ स्थानिकांना मिळावा, त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, जीवनमान सुधारावे, यासाठी योजनेतून प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये विविध शासकीय विभाग, जिल्ह्यात काम करू इच्छिणाºया खासगी कंपन्या, सामाजिक संस्था, सीएसआर फाऊंडेशन, खासगी गुंतवणूकदार, उद्योजक, जिल्ह्यातील उत्पादक, बचतगटाच्या समन्वयातून शाश्वत आर्थिक विकास साधण्याचे काम सुरू आहे.
कृषी, फलोत्पादन आणि संलग्न सेवा, पर्यटन, पशुधन विकास, दुग्धव्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय, उद्योग व खनिज विकास व संलग्न प्रक्रिया उद्योग, वने, वनोत्पादन व पर्यावरण, जलसंधारण, ग्रामविकास, दारिद्रय निर्मूलन आणि कौशल्य विकास अशा काही या क्षेत्रावर लक्ष केंद्रीत करून योजनेत उपाययोजना सूचविण्यात आल्या आहेत. या सर्व क्षेत्रांच्या अनुषंगाने सुक्ष्म नियोजन करून करण्यात येणाºया कामांच्या संकल्पना व प्रगतीचे सादरीकरण पुढील बैठकीत करावे, असे निर्देशही सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिले.
कोषागार कार्यालयाचे काम लवकर पूर्ण करा
राज्यातील सर्व कोषागार आणि उपकोषागार कार्यालयांचे आधुनिकीकरण करावे व चंद्रपूर कोषागार कार्यालयाचे काम २६ जानेवारी २०१९ पर्यंत पूर्ण करावे, अशा सूचना ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. यावेळी वित्त विभागाच्या लेखा आणि कोषागार सचिव वंदना कृष्णा उपस्थित होत्या. लेखा आणि कोषागारांच्या इमारतींसाठी एक उत्तम संकल्पना तयार कराव्यात, असे ना. मुनगंटीवार यांनी सांगितले.