चंद्रपुरातील स्पीडब्रेकर जीवघेणे
By admin | Published: January 4, 2015 11:10 PM2015-01-04T23:10:15+5:302015-01-04T23:10:15+5:30
अपघात टाळण्यासाठी गर्दीच्या मार्गावर गतिरोधक तयार करण्यात येतात. चंद्रपुरातही ते तयार करण्यात आले. मात्र वाहनांची गती कमी करण्यासाठी तयार करण्यात आलेले हे गतीरोधक चंद्रपूरकरांसाठी धोकादायक ठरत आहेत.
संतोष कुंडकर - चंद्रपूर
अपघात टाळण्यासाठी गर्दीच्या मार्गावर गतिरोधक तयार करण्यात येतात. चंद्रपुरातही ते तयार करण्यात आले. मात्र वाहनांची गती कमी करण्यासाठी तयार करण्यात आलेले हे गतीरोधक चंद्रपूरकरांसाठी धोकादायक ठरत आहेत.
रस्त्यांची दुर्दशा आणि धूळ या दोहोंमुळे वैतागलेल्या चंद्रपूरकरांच्या सोयीसाठी महानगरपालिकेने मुख्य मार्गाचे डांबरीकरण केले, तर शहरातील विविध भागात सिमेंटचे रस्ते तयार केलेत. शहरवासीयांना खड्ड्यांच्या डोकेदुखीतून मुक्ती मिळाली असली तरी नव्याने तयार करण्यात आलेल्या उंच गतिरोधकांनी वैताग वाढविला आहे. या मागील उद्देश चांगला असला तरी गतिरोधक तयार करताना कोणताही विचार करण्यात आलेला नाही. काही रस्त्यांवरील गतिरोधक इतके उंच आहेत की, त्यावरून जाताना वाहनधारकाची लहानशी चूकही त्याच्या जीवावर बेतू शकते. एखादे वाहन वेगाने येत आहे आणि त्याला गतिरोधक दिसले नाही, तर त्या उंच गतिरोधकावरून वाहन उसळून अपघाताचीच शक्यता अधिक आहे. तसे अपघातही या गतिरोधकांमुळे झाले आहेत.
आझाद बाग आणि हिंदी सिटी हायस्कूल याच्या मधून जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दोनही टोकाला सिमेंट रस्त्यावर गतिरोधक तयार करण्यात आले आहेत. हे गतिरोधक इतके उंच आहेत की, लहान वाहने त्याच्यावरून नेल्यास गतीरोधकाला वाहने घासून वाहनांचे नुकसान होत आहे. त्याच्या खुणाही गतीरोधकावर स्पष्ट दिसतात. पश्चिम दिशेने येणाऱ्या वाहनधारकाला हिंदी सिटी हायस्कूल समोरील गतीरोधक अनेकदा दिसत नाही. त्यामुळे या ठिकाणी वारंवार वाहने उसळत आहेत. किरकोळ अपघातही घडत आहेत. केवळ याच मार्गावर नाही तर शहरातील अनेक सिमेंट रस्त्यावर अशी परिस्थिती आहे. (प्रतिनिधी)