मनपाच्या ‘भिंती रेखांकन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 11:39 PM2017-12-29T23:39:20+5:302017-12-29T23:39:43+5:30
स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत चंद्रपूर शहर महानगरपालिका तसेच आशा महिला बहुउद्देशीय व प्रभू फाऊंडेशनच्या वतीने स्थानिक आझाद बगीचा येथे शुक्रवारी भिंती रेखांकन चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत चंद्रपूर शहर महानगरपालिका तसेच आशा महिला बहुउद्देशीय व प्रभू फाऊंडेशनच्या वतीने स्थानिक आझाद बगीचा येथे शुक्रवारी भिंती रेखांकन चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.
‘स्वच्छ चंद्रपूर’ या विषयावर आयोजित या स्पर्धेत १२५ शालेय व महाविद्यालयीन संघानी सहभाग नोंदविला. यात विविध शाळेतील ५९ विद्यार्थी संघ तसेच महाविद्यालये व खुल्या गटातून ६६ संघांनी सहभाग घेतला. भिंती चित्र रेखांकनासाठी स्पर्धकांना साहित्य मनपातर्फे पुरविण्यात आले. महापौर अंजली घोटेकर यांच्या हस्ते फीत कापून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. अशा चित्रकला स्पर्धा विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणाला वाव देण्यास मदत करते. काही विचार, कल्पना शब्दातून मांडता येत नाहीत. पण त्या कागदावर व भिंतीवर सहजरित्या उतरतात. शहर स्वच्छतेच्या विद्यार्थ्यांच्या कल्पना आज आपण सर्वांना या निमित्ताने बघायला मिळेल. शहर स्वच्छ करताना सुंदर कसे करावे, ही स्पर्धा याचे उत्तम उदाहरण होय. आपण या शहराचे जबाबदार नागरिक आहोत. स्वच्छता सर्वेक्षणात सहभाग घेवून शहराला स्वच्छ ठेवण्यास मदत करावे, यात आपला शहर स्वच्छ व सुंदर दिसेल, असे मनोगत महापौर यांनी व्यक्त केले.
मनपा आयुक्त संजय काकडे यांनी स्वच्छतेसाठी मनपाच्या प्रयत्नांची माहिती उपस्थितांना दिली. स्वच्छता राखण्यास नागरिकांचे योगदान महत्त्वाचे आहे. केवळ मनपाचे प्रयत्न अपुरे आहेत, समाजातील सर्व स्तरातील नागरिकांनी या देशव्यापी उपक्रमात सहभागी व्हावे. स्वच्छ भारत ही केवळ योजना न राहता चळवळ बनावी, यासाठी जनजागृती करण्यावर चंद्रपूर महानगरपालिकेचा भर आहे, असे सांगितले.
मनपाच्या या चित्रकला स्पर्धेमुळे आझाद बगिचाची चारही बाजूची संरक्षण भिंत आता बोलकी झाली असून विजेत्यांना एका कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे.