चंद्रपुरात महिलेच्या लैंगिक छळाचा आरोप असलेल्या वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 10:40 AM2017-12-23T10:40:18+5:302017-12-23T10:44:48+5:30
महिला वनरक्षकाचा लैंगिक व मानसिक छळ केल्याचा आरोप असलेले वनपरिक्षेत्र अधिकारी डी. एन. केंद्रे यांनी कीटकनाशक प्राशन केले. त्यांना तातडीने गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले मात्र शनिवारी त्यांचे निधन झाले.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : महिला वनरक्षकाचा लैंगिक व मानसिक छळ केल्याचा आरोप असलेले वनपरिक्षेत्र अधिकारी डी. एन. केंद्रे यांनी महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या ब्रह्मपुरी विभागीय कार्यालयात सहाय्यक व्यवस्थापकाच्या समक्ष कीटकनाशक प्राशन केले. त्यांना तातडीने गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले मात्र शनिवारी त्यांचे निधन झाले. या घटनेने वनविभागात एकच खळबळ उडाली आहे.
वनरक्षक महिलेच्या लैंगिक व मानसिक छळाच्या आरोपावरून चंद्रपूर उत्तरचे महाव्यवस्थापक मुकेश गणात्रा यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी डी.एन. केंद्रे यांची गुरुवारी चंद्रपूर येथे तडकाफडकी बदली केली. शुक्रवारी दुपारी केंद्रे थेट ब्रह्मपुरी विभागीय कार्यालयात पोहोचले. तेथे सहाय्यक व्यवस्थापक डी.एच. चांदेकर यांच्या कक्षात जाऊन बसले. माझी बदली का केली म्हणून चांदेकर यांना विचारणा केली. चांदेकरांनी उत्तर देण्यापूर्वीच त्यांनी खिशातून कीटकनाशक काढले आणि प्राशन केले. त्यांना अडवून लगेच ब्रह्मपुरी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. नंतर गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले होते.
वरिष्ठ अधिकारी या प्रकरणात केंद्रे यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप पीडितेने केला होता. केवळ चालढकल चौकशीमुळे पीडिता आणि केंद्रे तक्रार झाल्यापासून मानसिक तणावात असल्याची चर्चा आहे. हे प्रकरण तक्रारीनंतर कायदेशीरपणे हाताळले असते तर कदाचित हा प्रकार घडला नसता असेही बोलले जात आहे.