ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात लिंगभेद करून कामाची समानता नाकारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 09:51 AM2018-01-02T09:51:01+5:302018-01-02T09:53:07+5:30

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील महिला गाईडसोबत लिंगभेद करून कामाची समानता नाकारणाऱ्या मुख्य वनसरंक्षकांसह उपवनसंरक्षक व आदिवासी ग्रामविकास पर्यटक मार्गदर्शक व वन्यप्राणी संरक्षण समिती अध्यक्षाविरुद्ध महिला गाईडने दूर्गापूर पोलिसात तक्रार दाखल केली.

In Tadobae Andheri Tiger Reserve, the gender parity was denied by the work | ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात लिंगभेद करून कामाची समानता नाकारली

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात लिंगभेद करून कामाची समानता नाकारली

googlenewsNext
ठळक मुद्देमुख्य वनसंरक्षकांचा प्रताप महिला गाईडची पोलिसात तक्रार

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील महिला गाईडसोबत लिंगभेद करून कामाची समानता नाकारणाऱ्या मुख्य वनसरंक्षकांसह उपवनसंरक्षक व आदिवासी ग्रामविकास पर्यटक मार्गदर्शक व वन्यप्राणी संरक्षण समिती अध्यक्षाविरुद्ध महिला गाईडने दूर्गापूर पोलिसात तक्रार दाखल केली. सदर मुख्य वनसंरक्षकांवर तात्काळ कारवाई करा, अशी मागणीही तक्रारीत केली आहे. वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल झालेला नव्हता.
कामाच्या ठिकाणी महिला-पुरूष असा भेदभाव करता येत नाही. भारतीय संविधानाचे अनुच्छेद १४ नुसार लिंगभेद करता येत नाही. परंतु ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील महिला गाईडना काम देताना महिला-पुरूष असा भेदभाव करून कामापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही तक्रारीतून केली आहे.

यापूर्वीच केली होती तक्रार
महिला गाईड म्हणून काम करताना या कामात आधीपासून असलेल्या पुरूष गाईडनी महिला गाईडना सन्मानाची व समानतेची वागणूक दिली नाही. या महिलांचा अपमान होईल, अशा पद्धतीने कामाच्या ठिकाणी बोलणे व वागणे सुरू केले.
याबाबत त्याचवेळी भद्रावती पोलिसात तक्रार केली होती. तत्कालीन ठाणेदार यांनी याची दखल घेत पुरुष गाईडना याबाबत तंबी दिली होती. तरीही महिला गाईडना पुरूष गाईडसारखी वागणूक व कामे न दिल्याने या असमानतेबाबत १९ आॅगस्ट २०१६ रोजी मुख्य वनसरंक्षक कार्यालयाला लेखी पत्र दिले आहे. मात्र यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यानंतर वारंवार या कार्यालयाशी व उपसंचालक (कोअर) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
उपसंचालक मानकर यांनी याबाबीची गंभीर दखल घेत असल्याचे सांगून आश्वस्त केले होते व पुरूष गाईडप्रमाणेच महिला गाईडनाही कामाची संधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे सांगितले होते. मात्र यावरही कोणतीच कार्यवाही झाली नाही, अशी माहिती अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांनी दिली.

श्रमिक एल्गारचे धरणे
या प्रकाराच्या विरोधात महिलांनी सोमवारी श्रमिक एल्गारच्या नेतृत्वात एक दिवसीय धरणे आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले. महिला-पुरूष असा गैरकायदेशीर भेदभाव दूर करण्याबाबत श्रमिक एल्गारने वनविभागाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. मात्र अधिकाऱ्यांनी या महिलांना न्याय देण्याऐवजी त्यांच्यावर दबाव आणणे सुरू केल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांनी सांगितले. आंतराष्ट्रीय दर्जाच्या व्याघ्र प्रकल्पात महिला गाईड असल्याचा अभिमान वनविभागाला असायला हवा होता. मात्र या महिलांना प्रोत्साहन देण्याऐवजी त्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न चालविला जात असल्याचा या महिलांचा आरोप आहे. धरणे आंदोलनात श्रमिक एल्गारचे उपाध्यक्ष विजय सिद्धावार तसेच महासचिव घनश्याम मेश्राम व महिला गाईड सहभागी झाले होते.

Web Title: In Tadobae Andheri Tiger Reserve, the gender parity was denied by the work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.