तहानलेल्या गावांचा टँकरसाठी टाहो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 12:20 AM2018-04-13T00:20:32+5:302018-04-13T00:20:32+5:30
चंद्रपूरसह संपूर्ण जिल्हाच सध्या पाणीटंचाईने बेजार झाला आहे. जिल्ह्याच्या मिनी मंत्रालयाने कृती आराखडा तयार करून हातावर हात ठेवले आहे. कृती करण्याचा त्यांना विसर पडला आहे. जिल्ह्यात ९५८ गावात भीषण पाणीटंचाई आहे.
रवी जवळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूरसह संपूर्ण जिल्हाच सध्या पाणीटंचाईने बेजार झाला आहे. जिल्ह्याच्या मिनी मंत्रालयाने कृती आराखडा तयार करून हातावर हात ठेवले आहे. कृती करण्याचा त्यांना विसर पडला आहे. जिल्ह्यात ९५८ गावात भीषण पाणीटंचाई आहे. ग्रामस्थ पाण्यासाठी टाहो फोडत असतानाही जिल्हा प्रशासनाने अद्याप एकाही गावात टँकर लावून गावकऱ्यांची तहान भागविण्याचे सौजन्य दाखविले नाही. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने जिल्ह्यातील पाण्याची पातळी कमालीची खालावली आहे. अकराही मोठे सिंचन प्रकल्प अखेरची घटका मोजत आहे. नदी-नाल्यातही अत्यल्प जलसाठा आहे. नद्यांमध्ये पाणी नसल्याने ग्रामीण पाणी पुरवठा योजना प्रभावित झाल्या आहेत. हातपंप, विहिरी, बोअरवेल यामध्येही पाणी नाही. जिल्हा परिषदेच्या पाणी टंचाई कृती आराखड्यानुसार जिल्ह्यातील ९५८ गावात पाणी टंचाई आहे. जि.प. च्या सर्व्हेक्षणाचा हा आकडा असला तरी प्रत्यक्षात हजारो गावे पाण्यासाठी टाहो फोडत आहे. लखमापूर, बिबी, नांदा, कोठोडा, धामणगाव, नैतामगुडा, आसर (बु.), खिर्डी, वडगाव, चन्नई, मांगलहिरा, कोरपना, वनसडी, पिपर्डा, कोडशी (बु.), धोपटाळा, कन्हाळगाव, पिट्टीगुडा, भुरी येसापूर, अंतापूर, पदमावती, इंदिरानगर, पाटागुडा, कुंभेझरी, घनपठार यासारख्या अनेक गावात नागरिक पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. जिवती, कोरपना तालुक्यात तर खड्डा खोदून त्यातील पाणी नागरिकांना प्यावे लागत आहे. हातपंपाला पाणी नसल्याने त्यात पाणी जमा होण्याची वाट पाहत गावकरी रात्रभर जागे राहतात. मध्यरात्री उठून पाणी भरतात. एवढी भिषण परिस्थिती असताना जिल्हा प्रशासनाने अद्याप एकाही गावात टँकर लावला नाही. टंचाईग्रस्त गावातील गावकरी सातत्याने गावात टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी करीत आहेत. मात्र या मागणीकडे जिल्हा प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. असेच दुर्लक्ष होत राहिले तर पाण्यासाठी सुरू असलेल्या संघर्ष एखाद्याच्या जिवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही.
उपाययोजना अनेक; पण अंमलबजावणी नाही
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेने आपल्या आराखड्यात विहिरीचे खोलीकरण, इनवेल बोअर मारणे, खासगी विहिरी अधिग्रहण करणे, नवीन विंधन विहिरी, कुपनलिका लावणे, तात्पुरती पुरक योजना निर्माण करणे, बंद पडलेले हातपंप, पाणी पुरवठा योजना दुरुस्त करणे, टँकरने पाणी पुरवठा करणे आदी उपाययोजना समाविष्ट करण्यात आल्या आहेत. आराखड्यात या उपाययोजनांच्या समोर आकड्याचे गणितही मोठ्या दिमाखाने मांडण्यात आले आहे. १३६१ उपाययोजनांचे काम प्रस्तावित आहे. मात्र कोणत्याही उपाययोजना पूर्णत्वास गेलेल्या नाही.
नदीची धार आटली
पूर्वी गावकरी पाणी टंचाई असली की बैलबंडीवर ड्रम बांधून थेट नदीवर पाणी भरायला जात होते. लग्नसराईत तर हे चित्र हमखास दिसायचे. मात्र आता नदी-नाल्यांचीही धार आटली आहे. लहानसहान नद्यांचे पात्र कोरडे पडल्यामुळे तिथूनही पाणी आणणे कठीण झाले आहे. ग्रामीण भागात एखाद्याच्या घरात लग्नसोहळा असेल तर पाण्याची तजवीज कशी करावी, हाच सर्वात मोठा प्रश्न उभा ठाकत आहे.
जनावरांच्या पाण्याचा प्रश्न बिकट
जवळजवळ जिल्ह्यातील सर्वच गावात पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. नागरिकांसोबत जनावरांच्या चारा आणि पाण्याचाही प्रश्न बिकट होत चालला आहे. गावखेड्यातील पाण्याचे स्रोत आटले असल्याने जनावरांना पाणी पाजायला कुठे न्यावे, हे पशुपालकांना समजेनासे झाले आहे. मामा तलावात
अत्यल्प जलसाठा
सूर्य आग ओकत असल्याने जमिनीतील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. जमिनीतील ओलावा केव्हाचाच नष्ट झाला आहे. जंगले, माळरान ओसाड पडत चालले आहे. यासोबतच जिल्ह्यातील मामा तलावातही पाण्याचा अत्यल्प साठा शिल्लक आहे. यामुळे गावखेड्यातील पाण्याचे स्रोत झपाट्याने आटत चालले आहे. त्यामुळे ग्रामीण पट्टयातील बहुतांश भागात
पाणीटंचाई जाणवत आहे. दूरवरून नागरिकांना पाणी आणावे लागत आहे.