विषारी साप पकडल्याची वनविभागात नोंदच नाही
By Admin | Updated: August 1, 2016 00:35 IST2016-08-01T00:35:24+5:302016-08-01T00:35:24+5:30
कोणत्याही प्रजातीचा साप पकडल्यास वनविभागाकडे असलेल्या रजिस्टरमध्ये नोंद करणे नियमाप्रमाणे गरजेचे आहे.

विषारी साप पकडल्याची वनविभागात नोंदच नाही
सापाच्या तस्करीची शक्यता : वरोरा वनविभागाची सावरासावर
वरोरा : कोणत्याही प्रजातीचा साप पकडल्यास वनविभागाकडे असलेल्या रजिस्टरमध्ये नोंद करणे नियमाप्रमाणे गरजेचे आहे. वरोरा शहरानजीक एका शेतातील विहिरीमध्ये विषारी साप सर्पमित्राने पकडला. परंतु वनविभागात त्याबाबत नोंद केली नाही. ही माहिती उघड होताच वरोरा वनविभागाने सावरासावर सुरू केली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याविषारी सापाची तस्करी होत असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
वरोरा वनपरिक्षेत्र कार्यालया अंतर्गत येणाऱ्या येन्सा गावाच्या शेत शिवारातील विहिरीमध्ये दोन साप आढळल्याने शेतकऱ्याने सर्पमित्रास पाचारण केले.
त्यातील एक साप मृत अवस्थेत आढळल्याने त्याला शेतात पुरण्यात आले तर दुसरा विषारी साप घेऊन सर्प मित्र निघून गेले. २२ जुलैची घटना असताना वनविभागाच्या रजिस्टरमध्ये नोंद कित्येक तासापर्यंत करण्यात आली नाही. याबाबत वनविभाग संपूर्णपणे अनभिज्ञ होता.
ही बाब काही जागरुक नागरिकांनी उघडकीस आणताच वनविभाग जागा झाला व २२ जुलैच्या घटनेची २६ जुलै रोजी वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चौकशी केली.
याचा अर्थ चार दिवस नोंदी अभावी साप कुठे ठेवला, याची माहिती कळू शकली नाही.
चार दिवसापर्यंत विषारी साप बाळगल्या प्रकरणी वनविभागाने कुठलीही कारवाई संबधीतावर केली नसल्याचे दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)
सर्पमित्राबाबत
वनविभाग अनभिज्ञ
वरोरा तालुक्यात किती सर्पमित्र आहेत, याची अज्ञावत माहती वनविभागाकडे दिसून येत नाही. त्यामुळे अनेक सर्पमित्र या परिसरात तयार झाले असून त्यांच्यावर वनविभागाचा अंकुश नसल्याने विषारी सापाच्या तस्करीची शक्यता वर्तविली जात आहे.
विषारी साप शेतात सोडला
कुठलाही प्राणी सापडल्यास त्याची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वनविभाग तपासणी केल्यानंतर त्याला जंगलात सोडण्यात येते. पकडलेला विषारी साप एका शेतात सोडल्याची लेखी माहिती वनविभागाच्या वतीने देण्यात आली. शेतात साप सोडल्यानंतर तो जिवंत राहिल काय, हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत आहे. साप मरणासन्न अवस्थेत होता, अशी माहिती वनविभाग देत आहे. साप चार दिवस अन्नापासून वंचित राहिल्याने तो मरणसन्न अवस्थेत होता, हे निष्पन्न होत आहे.