हजारो बौध्द अनुयायांकडून महामानवाला अभिवादन
By admin | Published: December 7, 2015 05:11 AM2015-12-07T05:11:17+5:302015-12-07T05:11:17+5:30
भारतीय संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ५९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त
चंद्रपूर : भारतीय संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ५९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चंद्रपुरातील हजारो बौध्द अनुयायांनी गांधी चौक मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. यावेळी बाबासाहेबांचे अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील सर्वच बुध्द विहारात व वॉर्डावॉर्डात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर शहरातील सर्व बौध्द विहारातून व धम्मध्वजापासून बौध्द अनुयायांची रॅली काढण्यात आली. या रॅलीत त्या वार्डातील बहुसंख्य नागरिक सहभागी झाले होते. बाबासाहेबांच्या घोषणा देत सर्व रॅली गांधी चौक ते जयंत टॉकीज मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत आली. तिथे रॅली विसर्जित करण्यात आली. तत्पूर्वी समता सैनिक दलाच्या जवानांनी अतिशय शिस्तीत रॅली काढून बाबासाहेबांना सलामी देत श्रध्दांजली अर्पण केली. यावेळी बहुजन समाज पार्टीच्या वतीनेही बाईक रॅली काढण्यात आली. अनेक रॅलीचे नेतृत्व भिक्खू संघाने केले होते. रॅलीदरम्यान ‘महापरिनिर्वाण दिन चिरोयू होवो’, ‘जबतक सुरज चांद रहेगा, बाबासाहेब तुम्हारा नाम रहेगा’, अशा घोषणा देण्यात येत होत्या. सर्व रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आल्यानंतर या ठिकाणी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावरही उपस्थित पाहुण्यांनी प्रकाश टाकला. (शहर प्रतिनिधी)
सायंकाळी निघाली भीमज्योत रॅली
रविवारी सकाळपासून बौध्द अनुयायी बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ एकत्रित होऊ लागले. सायंकाळपर्यंत बौध्द अनुयायांचे येणे सुरूच होते. त्यानंतर सायंकाळी ७.१५ वाजताच्या सुमारास बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरून भव्य भिमज्योत रॅली काढण्यात आली. कॅण्डल घेऊन हजारो बौध्द अनुयायी यात सहभागी झाले. ही भिमज्योत रॅली दीक्षाभूमीवर गेली. तिथेही महामानवाला अभिवादन करण्यात आले.
मुख्यमंत्र्यांनीही केले अभिवादन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एका खासगी कामासाठी आज रविवारी चंद्रपुरात आले होते. त्यांनीही महापरिनिर्वाण दिनानिमित्त येथील गांधी चौकाजवळ स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, आ. नाना श्यामकुळे उपस्थित होते.
बाबासाहेबांच्या राज्यघटनेमुळेच
लोकशाही समृध्द बनली-अहीर
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या राज्यघटनेमुळेच देशाचे सार्वभौमत्व व या देशाची लोकशाही समृध्द बनली, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सव समितीच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ आयोजित श्रध्दांजली कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी हंसराज अहीर यांनीही बाबासाहेबांच्या अस्थीकलशाला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.