जिल्ह्याची वाहतूक धोकादायक वळणावर
By admin | Published: June 21, 2014 11:53 PM2014-06-21T23:53:44+5:302014-06-21T23:53:44+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात वाहनांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शहरांच्या सीमा वाढत आहे. मात्र वाहतुकीची साधने नसल्याने नागरिकांना खासगी वाहने घ्यावी लागत आहे. अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद होत आहे.
जड वाहतूकही तेजीत : वाहने वाढली; मात्र व्यवस्थेत बदल नाही
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात वाहनांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शहरांच्या सीमा वाढत आहे. मात्र वाहतुकीची साधने नसल्याने नागरिकांना खासगी वाहने घ्यावी लागत आहे. अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद होत आहे. उद्योगांमुळे जड वाहतूक वाढली आहे. या जड वाहतुकीमुळे रस्त्यांचे बारा वाजले आहेत. या सर्व प्रकारामुळे जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण वाढून वाहतूक धोकादायक वळणावर येऊन ठेपली आहे.
चंद्रपूर जिल्हा औद्योगिक जिल्हा म्हणून नावारुपास आला आहे. सिमेंट उद्योग, कोळसा खाणी, थर्मल पॉवर स्टेशन, एमईएल, आर्डीनन्स फॅक्टरी याशिवाय अनेक उद्योग जिल्ह्यात आहे. आणखी अनेक उद्योग प्रस्तावित आहेत. या उद्योगांमुळे बाहेर राज्यातील कामगार, कर्मचारी जिल्ह्यात स्थायिक झाले आहेत. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याची लोकसंख्या वाढून २३ लाखांच्या घरात गेली आहे. यासोबतच जिल्ह्यात मोठ्या शहरांच्या सीमारेषेतही वाढ होत आहे. शहरे वाढल्याने नागरिकांना प्रत्येक गोष्टींसाठी वाहनांची गरज पडू लागली आहे. नागपूर, मुंबईसारख्या मेट्रो सीटीप्रमाणे वाहतूक साधने नसल्याने स्वत:चे वाहन घेण्याशिवाय नागरिकांकडे पर्याय नाही. त्यामुळे वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मार्च २०१४ पर्यंत जिल्ह्यात ३ लाख ७४ हजार ४४७ वाहनांची नोंद आहे.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार ३१ मार्च २०१४ पर्यंत एकूण २८ हजार ९३५ वाहने पासींग करण्यात आली आहेत. यात दुचाकी वाहनांची संख्या अधिक आहे. २०१३-१४ मध्ये दुचाकी वाहनांची संख्या २४ हजार ३२३ पर्यंत वाढली आहे. यात मोटर सायकलची संख्या १५ हजार १२८, स्कूटरची संख्या ५ हजार ५०३ व मोपेडची संख्या ३ हजार ६९२ आहे. कारच्या संख्येत वाढ झाली आहे. यावर्षात १ हजार ७२८ कारसोबतच २४५ जीपचे पंजीकरण येथील आरटीओ कार्यालयात करण्यात आले आहे. यासोबतच टुरिस्ट लक्झरी बसची संख्याही ५६ झाली आहे. आॅटोरिक्षाची संख्या ९३, मिनीबस १६, स्कूल बस ३६ व खासगी सर्व्हिस वाहने ६ अशी वाहनांची संख्या आहे.
उद्योगांमुळे जिल्ह्यात औद्योगिक अपघातही वाढले आहेत. यामुळे रुग्णवाहिकांच्या संख्येतही वाढ होत आहे. यावर्षात १७ रुग्णवाहिका, ३३ मल्टी सर्व्हिसेस वेहीकल, २२६ ट्रक आणि लॉरी, १२ टँकर्स, ७८८ चारचाकी डिलेव्हरी वाहने, ९७ तीनचाकी डिलेव्हरी वाहने, ९६१ ट्रक्टर्स, २३२ ट्रेलर व इतर ६६ वाहनांचेही उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात पंजीकरण करण्यात आले आहे.
एवढ्या मोठ्या संख्येत वाहने वाढत आहेत. मात्र त्या दृष्टीने वाहतूक व्यवस्थेत पाहिजे तसा बदल अजूनही घडून आलेला नाही. अरुंद रस्ते आणखी अरुंद होत आहेत. याशिवाय रस्त्यावरील अतिक्रमणे वाढली आहेत. सर्वात गंभीर बाब ही की निम्म्याहून अधिक रस्त्यांवर खड्डयांची मालिका आहे.
चंद्रपूर शहराचाच विचार केला तर येथे पाच वर्षांपूर्वी जशी वाहतूक व्यवस्था होती, तशीच कायम आहे. वाहनांची संख्या मात्र तिपटीने वाढली आहे. त्यामुळे रस्ते वाहनांनी बरबटलेले दिसून येतात. परिणामी शहरात दररोज किरकोळ वा मोठे अपघात घडतच असतात. (शहर प्रतिनिधी)