समाज कल्याण विभागाचे सामाजिक न्यायाच्या दिशेने कार्य
By admin | Published: July 1, 2017 12:38 AM2017-07-01T00:38:56+5:302017-07-01T00:38:56+5:30
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत शोषित, पीडित व वंचित घटकांसाठी अनेक योजना राबवून त्यांच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक उन्नतीकरिता मोलाचे कार्य करीत आहे.
हंसराज अहीर : सामाजिक न्याय दिनाचा कार्यक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत शोषित, पीडित व वंचित घटकांसाठी अनेक योजना राबवून त्यांच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक उन्नतीकरिता मोलाचे कार्य करीत आहे. त्यांचे हे कार्य सामाजिक न्यायाच्या दिशेने सुरू असल्याची ग्वाही केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त समाज कल्याण कार्यालयातर्फे सामाजिक न्यायदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात आ. नाना श्यामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, प्रभारी जिल्हाधिकारी संजय धिवरे, जि.प. सभापती ब्रिजभूषण पाझारे, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती सदस्य दिलीपकुमार राठोड, सहायक आयुक्त प्रसाद कुळकर्णी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन व शाहू - फुले आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
मागासवर्गीयांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना गावातील शेवटच्या माणसापर्यंत कशा पोहोचतील व त्या प्रभावीपणे कशा राबविता येतील, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही पाहुण्यांनी यावेळी सांगितले. प्रभारी जिल्हाधिकारी संजय धिवरे व समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे यांनी महामानवाच्या जीवनावर प्रकाश टाकून आपले मनोगत व्यक्त केले. समाजाच्या कल्याणाकरिता असलेल्या योजना पाहून आपणही या विभागाशी जुळून काम केले पाहिजे, अशी इच्छा यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी संजय धिवरे यांनी व्यक्त केली.
यावेळी महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार देऊन सन्मानित केलेल्या हिरामण उरकुडा खोब्रागडे व कांता सिद्धार्थ ढोके यांचा ना. अहीर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
जागतिक अंमली पदार्थविरोधी दिनाचे औचित्य साधून व्यसनविरोधी पथनाट्य सादर करण्यात आले व दारुच्या व्यसनाने कुटुंब कसे उद्ध्वस्त होतात, याचे महत्व पटवून देणाऱ्या पथनाट्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक आयुक्त प्रसाद कुलकर्णी यांनी, आभार समाज कल्याण अधिकारी सुनील जाधव यांनी मानले. कार्यक्रमाचे संचालन सचिन फुलझेले यांनी केले.