जीवनदायी आरोग्य योजनेच्या ओळखपत्रात चुकीची माहिती
By admin | Published: November 29, 2014 11:18 PM2014-11-29T23:18:24+5:302014-11-29T23:18:24+5:30
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या ओळखपत्रात अनेक कुटुंबियाची माहिती चुकीच्या पद्धतीने नोंद करण्यात आली. आरोग्य ओळखपत्रे सिंदेवाही ग्रामपंचायतीमधून वितरीत केली जात आहेत.
सिंदेवाही : राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या ओळखपत्रात अनेक कुटुंबियाची माहिती चुकीच्या पद्धतीने नोंद करण्यात आली. आरोग्य ओळखपत्रे सिंदेवाही ग्रामपंचायतीमधून वितरीत केली जात आहेत. परिणामी रुग्णांना आरोग्य सुविधा मिळणार नसल्याने जनतेमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
ज्यांचे वय ६५ वर्षांचे आहे. त्यांच्या वयाची ओळखपत्रात ८७ वर्षांची नोंद आहे. याशिवाय ओळखपत्रात धक्कादायक माहितीची नोंद करण्यात आली आहे. ओळखपत्रात आईला पत्नी तर पत्नीला मुलगा म्हणून चुकीच्या नावाची नोंद करण्यात आली आहे. तसेच कुटुंबातील अन्य सदस्यांची नावे गहाळ करण्यात आली आहे. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना ही आरोग्य विमा योजना शासनाने उपलब्ध करून दिली असून यात निवडक ९७१ गंभीर आजारांवर लाभार्थ्यांना उपचार मिळणार आहे. शासन निर्णयानुसार पिवळे व केशरी शिधापत्रिकाधारक, अंत्योदय, अन्न सुरक्षा योजना शिधा पत्रिकाधारकांच्या लाभार्थी कुटुंबातील व्यक्तींना आरोग्य सुविधा पुरविण्याची योजना कार्यान्वित केलेली आहे. विशेषत: आरोग्य सुविधा देण्यासाठी ओळखपत्रावर कुटुंब प्रमुखासह सदस्यांची नावे समाविष्ठ करून छायाचित्रावरून लाभार्थी रुग्णांची ओळख पटविणे गरजेचे आहे. परंतु सिंदेवाही ग्रामपंचायतीमार्फत वितरीत करण्यात आलेल्या ओळखपत्रामध्ये कुटुंब प्रमुखाचे वय, नाव, नाते संबंध चुकीचे नोंद करण्यात आले असून कुटुंबातील सदस्याची नावे व मुलाचे नावे गहाळ केलेली आहेत. परिणामी खर्चित उपचाराचा लाभ कुटुंबातील रुग्णांना मिळणार नसल्याने शासनाची आरोग्य योजना कुचकामी असल्याची प्रतिक्रिया लाभार्थी व्यक्त करीत आहेत.
शासनाने गरीब कुटुंबाप्रती सदर योजना अंमलात आणली. परंतु प्रशासकीय यंत्रणेकडून योजना प्रभावीपणे राबविण्यात शासकीय कर्मचारी टाळाटाळ करीत आहेत. याबाबत सिंदेवाही ग्रामपंचायत कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
गरजु लाभार्थ्यांना आरोग्य सुविधाचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने ओळखपत्रातील चुकीच्या नोंदी रद्द करून ओळख पत्रामध्ये कुटुंबियाची नावे समाविष्ट करण्याची मागणी केली जात आहे. चुकीच्या ओळखपत्रामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)