औरंगाबाद जिल्ह्यात ६ जागा जिंकत शिवसेना ठरला मोठा भाऊ;भाजपच्या ताब्यात ३ जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 01:27 PM2019-10-25T13:27:31+5:302019-10-25T13:32:36+5:30
जिल्ह्यावर महायुतीचे वर्चस्व कायम
औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीच्या गुरुवारी जाहीर झालेल्या निकालानुसार जिल्ह्यावर महायुतीचे वर्चस्व कायम असल्याचे स्पष्ट झाले. यात ६ जागांवर शिवसेना, तर ३ जागांवर भाजपने यश मिळविले आहे. औरंगाबाद मध्य हा मतदारसंघ शिवसेनेने एमआयएमकडून खेचून घेतला आहे.
औरंगाबाद पूर्वमध्ये भाजपचे अतुल सावे, एमआयएमचे डॉ. गफ्फार कादरी यांच्यात थेट लढत झाली. यात सावे यांनी ९३,९६६ मते घेत कादरी यांचा १३ हजार ९३० मतांनी पराभव केला. औरंगाबाद पश्चिममध्ये संजय शिरसाट, अपक्ष राजू शिंदे आणि एमआयएमचे अमित भुईगळ यांच्यात लढत झाली. यात शिरसाट यांनी एकूण ८३,७९२ मते घेत बाजी मारली. मध्यमध्ये यावेळी सेनेचे प्रदीप जैस्वाल यांनी ८२ हजार २१७ मते घेत ही जागा एमआयएमकडून खेचून आणली. गंगापूरमध्ये हॅट्ट्रिक साधत भाजपचे प्रशांत बंब यांनी ३४,९७१ मतांनी विजय मिळविला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष माने यांचा पराभव केला.
ग्रामीणमधील निकालाचे चित्र असे
अब्दुल सत्तार यांची सरशी
सिल्लोडमध्ये शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांनी जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख २३ हजार ३८३ मते घेतली आहेत. त्यांनी अपक्ष उमेदवार प्रभाकर पालोदकर यांचा २४ हजार ३८१ मतांनी पराभव केला, तर फुलंब्री मतदारसंघात हरिभाऊ बागडे यांनी काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे यांचा १५,२७४ मतांनी पराभव केला. बागडे यांनी आठ वेळा निवडणूक लढविली असून, पैकी ते सहाव्यांदा निवडून आले.
ग्रामीणमध्येही भगवाच
पैठणमध्ये संदीपान भुमरे यांनी १४ हजार १३९ मताधिक्याने पाचव्यांदा विजय मिळविला असून, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्ता गोर्डे यांचा पराभव केला आहे. वैजापूरमध्ये सेनेचे रमेश बोरनारे यांनी राष्ट्रवादीचे अभय चिकटगावकर यांचा तब्बल ५८ हजार ८१८ मतांनी पराभव केला. कन्नडमध्ये सेनेचे उदयसिंह राजपूत यांनी अपक्ष हर्षवर्धन जाधव यांचा १८ हजार ६९० मतांनी पराभव केला.