Maharashtra Election 2019 : औरंगाबाद जिल्ह्यात ११३ हून अधिक ईव्हीएममध्ये बिघाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 06:52 PM2019-10-22T18:52:12+5:302019-10-22T18:58:05+5:30
काही ठिकाणी व्हीव्हीपॅटच्यादेखील तक्रारी आल्या.
औरंगाबाद : जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांत सायंकाळी ५ वाजेपर्यंत ९८ ईव्हीएममध्ये बिघाड झाला होता, असे निवडणूक उपजिल्हाधिकारी पांडुरंग कुलकर्णी यांनी सांगितले. पूर्ण जिल्ह्यात ११३ हून अधिक ठिकाणी ईव्हीएममध्ये मतदानादरम्यान बिघाड झाल्याचा ढोबळ आकडा होता. काही ठिकाणी व्हीव्हीपॅटच्यादेखील तक्रारी आल्या. राखीव यंत्रे तातडीने बदलून त्याठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक होण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले.
३ हजार २४ पैकी ३०६ मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग करण्यात आले होते. ती मतदान केंदे्र संवेदनशील असल्यामुळे तेथील मतदार आणि केंद्रांवरील हालचाली राज्य निवडणूक आयोगाच्या पथकाने थेट प्रसारणाने पाहिल्या. कुठल्याही मतदान केंद्रांवर अनुचित प्रकार घडला नसल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला. लोकसभा निवडणुकीत मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग करण्याचा प्रयोग करण्यात आला होता. त्या धर्तीवर विधानसभा निवडणुकीतही काही मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग करण्यात आले होते. मतदान केंद्रांवर सुरू असलेली प्रक्रिया कॅमेऱ्याच्या माध्यमातून निवडणूक निर्णय अधिकारी, सीईओ मुंबई यांच्या कार्यालयातून पाहिली गेली. एकूण मतदान केंद्रांपैकी सुमारे १० टक्के केंद्र वेबकास्ट करण्यात आली. सिल्लोडमध्ये ३६, कन्नडमध्ये ३५, फुलंब्रीत ३४, औरंगाबाद मध्यमध्ये ३५, औरंगाबाद पश्चिममध्ये ३५, औरंगाबाद पूर्वमध्ये ३४, पैठणमध्ये ३३, गंगापूरमध्ये ३०, वैजापूरमध्ये ३४ ठिकाणची मतदान केंद्रे वेबकास्ट केली होती.
२४ आॅक्टोबर रोजीचे मतमोजणी केंद्र असे
- सिल्लोड विधानसभा मतदारसंघ- शासकीय टेक्निकल शाळा, सिल्लोड.
- कन्नड विधानसभा मतदारसंघ- शिवाजी महाविद्यालय, इंडोअर स्टेडिअम.
- फुलंब्री विधानसभा मतदारसंघ- सिपेट इमारत, विमानतळाजवळ, औरंगाबाद.
- पैठण विधानसभा मतदारसंघ- प्रशासकीय इमारत, संतपीठ, उद्यान रस्ता, पैठण.
- गंगापूर विधानसभा मतदारसंघ- मुक्तानंद महाविद्यालय, इंडोअर स्टेडियम, गंगापूर.
- वैजापूर विधानसभा मतदारसंघ - विनायकराव पाटील महाविद्यालय, सभागृह क्रमांक १, येवला रस्ता, वैजापूर.
- औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघ- शासकीय तंत्रनिकेतन, उस्मानपुरा.
- औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघ- शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, रेल्वेस्टेशन रोड, उस्मानपुरा.
- औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघ- होमगार्ड कार्यालय (औरंगाबाद शहर), एन १२, हडको