Maharashtra Election 2019 : यावेळी मतदानाचा टक्का वाढलाच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 01:44 PM2019-10-22T13:44:40+5:302019-10-22T13:48:36+5:30
लोकसभेच्या मतदानापेक्षा मात्र विधानसभेसाठी झालेला मतदानाचा टक्का अधिक आहे.
- राम शिनगारे
औरंगाबाद : जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण मतदानाचा टक्का घसरल्याचे स्पष्ट झाले. जिल्हा माहिती कार्यालयाकडून प्राप्त झालेली जिल्ह्यातील मतदानाची अंदाजित आकडेवारी ६५.४५ टक्के एवढी आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्याची अंतिम आकडेवारी ६९.३३ एवढी होती. मागील विधानसभेच्या तुलनेत तब्बल ३.८८ टक्के एवढे मतदान कमी झाले आहे. याचवेळी सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या मतदानापेक्षा मात्र विधानसभेसाठी झालेला मतदानाचा टक्का अधिक आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड, कन्नड, फुलंब्री, औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम, औरंगाबाद पूर्व, पैठण, गंगापूर, वैजापूर या विधानसभा मतदारसंघांत सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सोमवारी (दि.२१) मतदान झाले. या मतदारसंघांमध्ये सायंकाळी सहा वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी जिल्हा निवडणूक विभागाकडून रात्री उशिरा प्राप्त झाली. यामध्ये जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांमध्ये ६५.४५ टक्के मतदान झाले. यात सिल्लोड ७३.०१ टक्के, कन्नड ६९.२४, फुलंब्री ७०.१५, औरंगाबाद मध्य ६०.१२, औरंगाबाद पश्चिम ६१.३२, औरंगाबाद पूर्व ६१.७५, पैठण ७१.०३, गंगापूर ६१.१८ आणि वैजापूरमध्ये ६१.७७ टक्के मतदान झाले आहे. या आकडेवारीमध्ये कमी-जास्त प्रमाणात आदलाबदलही होऊ शकते. मात्र, तरीही २०१४ च्या विधानसभेला झालेल्या मतदानापर्यंत पोहोचणे कठीण आहे. विधानसभेला घसरलेल्या मतदानाच्या टक्केवारीची विविध कारणे शोधण्यास सुरुवात झाली आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी औरंगाबादची बाजारपेठ तुडुंब भरलेली दिसून आली. त्याचवेळी मतदानासाठी शहरातील एकाही मतदारसंघात लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसूनही आले नाही. यात विशेष म्हणजे लोकसभेला साधारणपणे मतदानाची टक्केवारी घसरलेलीच असते. मात्र, विधानसभेला हा टक्का मोठ्या प्रमाणात वाढतो, असा सर्वसाधारण अंदाजही यावेळी धुळीला मिळाला. यावर्षी शनिवार, रविवार आणि मतदानासाठी दिलेली सोमवारी सुटी टक्का घसरण्याला कारणीभूत ठरल्याचेही बोलले जात आहे.
मराठवाड्यातील टक्केवारीही घसरली
औरंगाबाद जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी घसरली असताना दुसरीकडे मराठवाड्यातील टक्केवारीही घसरल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. २०१४ मध्ये मराठवाड्यातील विधानसभेची टक्केवारी ही ७५.२१ टक्के एवढी गेली होती. यावेळी विधानसभेला मराठवाड्यातील एकूण मतदान ६४.७१ टक्के एवढे आहे. यावरून मराठवाड्यातील मतदानाची टक्केवारी तब्बल १०.५० टक्के एवढी घसरल्याचे स्पष्ट होत आहे.
विधानसभा, लोकसभेतील टक्केवारी
मतदारसंघ विधानसभा लोकसभा विधानसभा
-२०१४ -२०१९ - २०१९
सिल्लोड ७५.२६ % ६३.०० % ७३.०१ %
कन्नड ६८.०६ % ६४.८० % ६९.२४ %
फुलंब्री ७३.०० % ६६.०० % ७०.१५ %
औरंगाबाद मध्य ६५.१८ % ६२.१९ % ६०.१२ %
औरंगाबाद पश्चिम ६४.३३ % ६२.७८ % ६१.३२ %
औरंगाबाद पूर्व ६६.७८ % ६२.८० % ६१.७५ %
पैठण ७३.७८ % ६९.०० % ७१.०३ %
गंगापूर ६७.८२ % ६५.८९ % ६१.१८ %
वैजापूर ७०.१० % ६२.४१ % ६१.७७ %