ओव्हल, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : जेसन रॉय व जॉनी बेअरस्टो यांनी उभ्या केलेल्या मजबूत पायावर इंग्लंडच्या अन्य फलंदाजांनी धावांचे इमले उभे केले. इंग्लंडने शनिवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात बांगलादेश संघासमोर विजयासाठी 387 धावांचे आव्हान ठेवले. रॉयने 153 धावांची खेळी, तर बेअरस्टो व बटलर यांचे अर्धशतक हे आजच्या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले. इंग्लंडची वर्ल्ड कप स्पर्धेतील ही सर्वोत्तम खेळी ठरली. यापूर्वी त्यांनी 2011मध्ये भारताविरुद्ध 338 धावा चोपल्या होत्या. इंग्लंडने या सामन्यात भारताचा विक्रम मोडला. इंग्लंडने 6 बाद 386 धावा केल्या. वन डे क्रिकेटच्या इतिहासात सलग 7 सामन्यांत 300+ धावा करणारा इंग्लंड हा पहिलाच संघ ठरला
बांगलादेशनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरला. रॉय आणि बेअरस्टो या जोडीनं बांगलादेशच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई करताना 15 षटकांत शतकी भागीदारी केली. 20व्या षटकात बांगलादेशला ही जोडी फोडण्यात यश आले. मशरफे मोर्ताझानं बेअरस्टोला माघारी पाठवले. मेहिदी हसनने त्याचा अप्रतिम झेल टिपला. बेअरस्टो 50 चेंडूंत 6 चौकारासह 51 धावा करून माघारी परतला. या जोडीनं पहिल्या विकेटसाठी 128 धावांची भागीदारी करत 2003च्या वर्ल्ड कपचा विक्रम मोडला. वर्ल्ड कप स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध सलामीवीरांनी केलेली ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. त्यांनी मार्व्हन अटापट्टू आणि सनथ जयसूर्या यांचा 126* धावांचा विक्रम मोडला.
बेअरस्टो माघारी परतल्यानंतर जेसन रॉयनं जोरदार फटकेबाजी केली. त्यानं वन डे क्रिकेटमधील 9वे शतक झळकावले, तर वर्ल्ड कपमधील त्याचे हे पहिलेच शतक ठरले. बांगलादेशविरुद्धही त्यानं प्रथमच शतकी खेळी केली. मेहीदी हसनने त्याला बाद केले. रॉयनं 121 चेंडूंत 14 चौकार व 5 षटकार खेचून 153 धावांची खेळी केली. वर्ल्ड कप स्पर्धेतील इंग्लंडच्या फलंदाजाची ही दुसरी सर्वोत्तम खेळी ठरली. 2011मध्ये अँण्ड्य्रू स्ट्रॉसने भारताविरुद्ध 158 धावा केल्या होत्या. हे दोघेही माघारी परतल्यानंतर जोस बटलर आणि कर्णधार इयॉन मॉर्गन यांनी दमदार खेळ करत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. बटलरने अर्धशतकी खेळी केली. या दोघांनी 95 धावांची भागीदारी केली. बटलर 44 चेंडूंत 2 चौकार व 4 षटकार खेचून 64 धावांवर माघारी परतला. त्यानंतर इंग्लंडला पाठोपाठ धक्के बसले, बांगलादेशच्या क्षेत्ररक्षकांनी उत्तम कामगिरी केली.
Web Title: ICC World Cup 2019 : England team registerd top score in world cup, they set 387 runs target for Bangladesh
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.