- बाळकृष्ण परब
काल क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्सवर जे काही घडले त्याचे वर्णन करायला अदभूत, अविश्वसनीय हे शब्दही कमी पडतील. महान अनिश्चिततेचा खेळ असे क्रिकेटला का म्हटले जाते याचा अनुभव लॉर्ड्सवर खेळत असलेले इंग्लंड आणि न्यूझीलंडचे खेळाडू, प्रत्यक्ष मैदानात उपस्थित असलेले प्रेक्षक आणि जगभरात दूरचित्रवाणीवरून ही लढत पाहत असलेल्या कोट्यवधी क्रिकेटप्रेमींनी घेतला. कुणी कल्पनाही केली नसेल अशी अंतिम लढत रंगली. कुठला संघ जिंकला नाही की कुणी हरलं नाही. अखेरीस डबल टाय झालेल्या लढतीत चौकार षटकारांच्या अधिक्यावरून विश्वविजेता ठरला.
महत्त्वाचं म्हणजे येता जाता क्रिकेटला नावं ठेवणाऱ्या आणि विनाकारण उणीदुणी काढणाऱ्यांची बोलती बंद करण्याचं काम या लढतीने केलंय. या खेळाला खेळांचा राजा का म्हटलं जातं, या खेळामधील थरार कुठल्या थराला जाऊ शकतो, याचा प्रत्यय अशा मंडळींनी घेतला असेल.
खरंच ही अंतिम लढत 'भुतो न भविष्यति:' अशीच होती. ती क्रिकेटप्रेमींच्या दीर्घकाळ स्मरणात तर राहणार आहेच. सोबतच खेळ म्हणून क्रिकेटच्या पुढील वाटचालीवरही परिणाम करणार आहे. क्रिकेटची गंमत म्हणजे हा खेळ भल्या भल्यांची गणिते चुकवतो. अनेकांना काही वेळात हवेत पोहोचवतो तर काहींना जमिनीवरही आणतो. त्याचं चालतं बोलतं उदाहरण म्हणजे अंतिम लढतीतील हीरो ठरलेला बेन स्टोक्स. बरोब्बर सव्वातीन वर्षांपूर्वी याच बेन स्टोक्सने टाकलेल्या शेवटच्या षटकात कार्लोस ब्रेथवेटने सलग चार षटकार ठोकल्याने टी-20 विजेतेपद इंग्लंडच्या हातून निसटले होते. पण आज नशिबाची साथ इंग्लंड आणि ला मिळाली. सुरुवातीला बेन स्टोक्सचा टिपलेला झेल बोल्टचा पाय सीमारेषेला लागल्याने षटकार ठरला. तर शेवटच्या षटकार गप्टिलचा थ्रो त्याच्या बँटला लागून थेट सीमारेषेपार गेला. निर्णायक क्षणी हे बँटलक इंग्लंडसाठी टर्निंग पॉईंट ठरले.
क्रिकेटचे जन्मदाते म्हणून मिरवणाऱ्या ब्रिटिशांना तब्बल 44 वर्षे या खेळाचे विश्वविजेतेपद मिळवण्यासाठी वाट पाहावी लागली. खरंतर क्रिकेटने आपल्या जन्मदात्यांची घेतलेली ही कठोर परीक्षाच म्हटली पाहिजे. यापूर्वी तीनवेळा फायनलमध्ये खेळूनही विश्वचषक जिंकता न आल्याने गोरे साहेब क्रिकेट जगतात चेष्टेचा विषय ठरले होते. यंदाही संभाव्य विजेते म्हणून मिरवणाऱ्या इंग्रजांना एकवेळ उपांत्य फेरीतील प्रवेशासाठी झगडावे लागले. त्यांचा फायनलमधील प्रतिस्पर्धी असलेल्या
न्यूझीलंडचीही तशीच अवस्था होती. पण हे दोन्ही संघ साखळीत दादागिरी करणाऱ्या अॉस्ट्रेलिया आणि भारत या संभाव्य विजेत्यांना घरी पाठवत अंतिम फेरीत पोहोचले होते.
क्रिकेटमध्ये आतापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणारे, बरोबरीत सुटणारे अनेक सामने झालेत, यापुढेही रंगतील. पण कालची अंतिम लढत हा क्रिकेटमधील या थराराचा सर्वोच्च बिंदू होता. खरंतर आजच्या सुपरफास्ट क्रिकेटच्या जमान्यात 241 ही अतिसामान्य धावसंख्या मानली जाते. त्यामुळेच की काय 242 धावांचं आव्हान मिळाल्यावर ब्रिटिशांनी शँपेनच्या बाटल्या फोडण्याची तयारी सुरू केली होती. पण अत्यंत संयमी आणि चतुर कर्णधार असलेल्या केन विल्यमसनने घरच्या मैदानावर खेळत असलेल्या ब्रिटिशांच्या तोंडाला फेस आणला. निश्चित वाटणारा इंग्लंडचा विजय हळूहळू दुरापास्त वाटू लागला. पण शेवटच्या क्षणी इंग्रजांवर हा खेळ आणि नशीब मेहेरबान झाले आणि विश्वचषकाचे दान त्यांच्या हातात पडले. पण या लढतीत इंग्लिश संघ निर्विवादपणे जिंकला नाही आणि त्यांचा प्रतिस्पर्धी न्यूझीलंडचा संघ हा पराभूत झाला नाही, अशीच नोंद इतिहासात होईल, हीच या खेळाची खासीयत आहे.
Web Title: ICC World Cup 2019: That's why cricket is a most interesting sports in world
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.