ठळक मुद्देकर्णधार स्टीव्ह स्मिथनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णयकांगारुंच्या संघात दोन बदल करण्यात आले आहेतभारतानेही आपल्या अंतिम 11 मध्ये तीन बदल केलं आहेत.
बंगळुरु - डेव्हिड वॉर्नर आणि अॅरोन फिंच या सलामीवीरांनी केलेल्या झंझावाती फटकेबाजीच्या बळावर कांगारुंनी भारतासमोर 335 धावांचे आव्हान ठेवलं आहे. वॉर्नर आणि फिंच जोडीनं 35 षटकांत 231 धावांची भागिदारी करत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. निर्धारित 50 षटकांत ऑस्ट्रेलियानं पाच विकेटच्या मोबदल्यात 334 धावां केल्या.
एकवेळ ऑस्ट्रेलिया 380 धावा करेल असं वाटत होतं मात्र केदार जाधवनं डेव्हिड वॉर्नरला बाद करत भारतासमोरीलम मोठा अडथळा दूर केला. वॉर्नरनं 119 चेंडूत 124 धावांची खेळी केली. याखेळीदरम्यान त्यानं चार षटकार आणि 12 चौकार लगावले. वॉर्नर बाद झाल्यानंतर फिंचही लगेच बाद झाला. फिंचनं 96 चेंडूत 94 धावांची खेळी केली. यादरम्यान त्यानं तीन षटकार आणि 10 चौकार लगावले. त्याला उमेश यादवनं पांड्याकरवी झेलबाद केलं. त्यानंतर मैदानावर आलेल्या कर्णधार स्मीथला फार काही कमाल दाखवता आली नाही. तोही स्वस्तात बाद झाला. त्याला अवघ्या तीन धावांवर उमेश यादवनं बाद केलं. तीन विकेट झटपट गेल्यानंतर कांगारुंच्या धावसंखेला चाप बसला. भारतीय कर्णधार विराट कोहलीनं योग्य वेळी गोलंदाजीत बदल करत कांगारुंना मोठ्या धावसंख्येकडे जाण्यापासून रोखलं. ट्रॅव्हिस हेडनं 38 चेंडूचा सामना करताना 29 धावा केल्या. पीटर हॅन्डस्कोम्बनं जोरदार फटकेबाजी करताना शेवटच्या षटकांमध्ये धावगती वाढवली. त्यानं 30 चेंडूचा सामना करताना 43 धावा केल्या.
दीर्घ विश्रांतीनंतर संघात पुनरागमन केलेल्या उमेश यादवनं प्रभावी मारा करताना चार कांगारुंची शिकार केली. उमेश यादव शिवाय केदार जाधवला एक विकेट मिळाली. अन्य गोलंदाज बळी घेण्यात अपयशी ठरले.
चौथ्या वन-डे सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कांगारुंच्या संघात दोन बदल करण्यात आले. ग्लेन मॅक्सवेल आणि अॅश्टन एगर यांच्या जागी मॅथ्यू वेड व अॅडम झम्पा यांना संधी देण्यात आली. भारतानेही आपल्या अंतिम 11 मध्ये तीन बदल केले. पहिल्या तीन सामन्यात दुखापतीमुळे बाहेर असणाऱ्या अक्षर पटेलनं संघात पुनरागमन केले. त्याला कुलदीप यादवच्या जागी संघात स्थान देण्यात आले. तर बुमराह आणि भुवनेश्वर या जोडीला आराम देत शमी आणि यादव यांना अंतिम 11 मध्ये स्थान दिले.
100 व्या वन-डे सामन्यात डेव्हिड वॉर्नरची शतकी खेळी
बंगळुरुत सुरु असलेल्या चौथ्या वन-डे सामन्यात डेव्हिड वॉर्नरनं धडाकेबाज शतक झळकावलं आहे. वॉर्नरचा हा 100 वा आंतरराष्ट्रीय वन-डे सामना असल्यामुळे त्याच्यासाठी हे शतक खास आहे. या सामन्यात फलंदाजीसाठी उतरल्यानंतर 100 वा सामना खेळणारा तो ऑस्ट्रेलियचा 28 खेळाडू ठरला. सध्या सुरु असलेल्या मालिकेतील दुसरा सामना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथचा 100 सामना होता. ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक वन-डे सामने खेळण्याचा विक्रम रिकी पॉटिंगच्या नावावर आहे. पॉटिंगनं 374 सामने खेळले आहेत. बंगळुरुत सुरु असलेल्या चौथ्या वन-डेत वॉर्नरनं 103चेंडूचा सामना करताना आपलं शतक पूर्ण केलं. या खेळीदरम्यान त्यानं 10 चौकार आणि 3 षटकार लगावले.
ह्या विक्रमाची संधी
सुमारे दहा वर्षांपूर्वी भारताने सलग ९ एकदिवसीय सामने जिंकण्याचा पराक्रम केला होता. बंगळुरुमध्ये आॅसीला नमवून हाच विक्रम मागे टाकण्याची संधी टीम इंडियाकडे आहे. आॅस्ट्रेलियाने सलग १० सामने जिंकण्याचा पराक्रम ६ वेळा केला आहे.
उभय संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, यजुवेंद्र चहल, उमेश यादव आणि मोहम्मद शमी
ऑस्ट्रेलिया : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मार्कस् स्टोयनिस, मॅथ्यू वेड, केन रिचर्डसन, पॅट कमिन्स, नाथन कूल्टर नाईल, अॅरोन फिंच, पीटर हॅन्डस्कोम्ब, आणि अॅडम झम्पा.
Web Title: IND vs AUS 4th ODI in Bangalore
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.