नॉटिंगहॅम - भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत पहिल्यांदाच भारतीय संघाचे पारडे जड आहे. कर्णधार विराट कोहलीने मालिकेतील दुसरे आणि कारकिर्दीतील २३वे शतक झळकावून भारताला मजबूत स्थितीत आणले आहे. भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 521 धावांचा डोंगर उभा केला आहे. या कसोटीच्या पहिल्या डावात अवघ्या तीन धावांनी विराटचे शतक हुकले होते, परंतु त्याची कसर त्याने दुसऱ्या डावात भरून काढली. या शतकाबरोबर त्याने अनेक विक्रम मोडले..
चला तर पाहूया विराटचे एक शतक अन् विक्रम, विक्रम, विक्रम....
२३
विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये २३वे शतक झळकावून विरेंद्र सेहवागच्या शतकांची बरोबरी केली. भारतीय खेळाडूंत तो आता सचिन तेंडुलकर (५१), राहुल द्रविड (३६) आणि सुनील गावस्कर (३४) यांच्या मागोमाग आहे.
०४
विराटने ११८ डावांत २३ शतकं झळकावली. अशी कामगिरी करणारा तो चौथा जलद फलंदाज ठरला. सर डॉन ब्रॅडमन (५९), गावस्कर (१०९) आणि स्टीवन स्मिथ (११०) यांनी सर्वात कमी डावांत २३ शतकं पूर्ण केली आहेत.
१६
कर्णधार म्हणून विराटने १६ कसोटी शतकं पूर्ण केली आहेत. त्याने ॲलन बॉर्डर, स्टीव्ह वॉ आणि स्टीव्ह स्मिथ यांना मागे टाकले आहे. या विक्रमात ग्रॅमी स्मिथ (२५) आणि रिकी पॉंटिंग ( १९) आघाडीवर आहेत.
११
विराटने ११ शतकं परदेशात पूर्ण केली आहेत. आशियाई खेळाडूने परदेशात केलेल्या शतकांत विराटने इंझमाम उल- हकला मागे टाकले. तेंडुलकर (१८), गावस्कर (१५) आणि द्रविड (१४) यांच्या नावे अधिक शतकं आहेत.
५०.०९
अर्धशतकाचे शतकात रुपांतर करण्याची विराटची (२३/४१) सरासरी ५०.०९ इतकी आहे. सर डॉन ब्रॅडमन (२९/४२) यांची सरासरी ही ६९.०५ आहे.
०६
सर्व प्रकारच्या फॉरमॅटमध्ये एका वर्षात पाचपेक्षा अधिक शतक झळकावण्याची किमया विराटने सहावेळा केली आहे .
१२
एका कसोटीत दोनशेहून अधिक धावा करण्याची विराटची ही १२वी वेळ. या क्रमवारीत कुमार संगकारा ( १७) , ब्रायन लारा ( १५), ब्रॅडमन ( १४) आणि पॉंटिंग ( १३) आघाडीवर आहेत.
०६
इंग्लंडमधील कसोटी मालिकेत ४०० पेक्षा अधिक धावा करणारा विराट हा सहावा भारतीय फलंदाज आहे. गावस्कर (१९७९), मोहम्मद अझरूद्दीन ( १९९०), तेंडुलकर ( १९९६ व २००२), द्रविड ( २००२ व २०११) आणि मुरली विजय (२०१४) यांनी अशी कामगिरी केली आहे.
440
विराटने या मालिकेत आत्तापर्यंत ४४० धावा केल्या आहेत आणि कर्णधार म्हणून भारतीय खेळाडूने केली की सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी हा विक्रम मोहम्मद अझरूद्दीनच्या (४२६ धावा) नावावर होता.
Web Title: India vs England 3rd Test: Virat Kohli creates captaincy record in England with 23rd Test century
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.