भारताची विजयी आघाडी, विश्वविजेत्या कांगारुंना धुतले

रोहित शर्मा (७१) व अजिंक्य रहाणे (७०) या मुंबईकर सलामीवीरांच्या आक्रमकतेनंतर हार्दिक पांड्याच्या (७८) तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने सलग तिस-या सामन्यात बलाढ्य आॅस्ट्रेलियाला ५ विकेट्सने लोळवून पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 01:52 AM2017-09-25T01:52:44+5:302017-09-25T01:53:14+5:30

whatsapp join usJoin us
India's winning lead, winners of World Cup Kangaroo | भारताची विजयी आघाडी, विश्वविजेत्या कांगारुंना धुतले

भारताची विजयी आघाडी, विश्वविजेत्या कांगारुंना धुतले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंदूर : रोहित शर्मा (७१) व अजिंक्य रहाणे (७०) या मुंबईकर सलामीवीरांच्या आक्रमकतेनंतर हार्दिक पांड्याच्या (७८) तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने सलग तिस-या सामन्यात बलाढ्य आॅस्ट्रेलियाला ५ विकेट्सने लोळवून पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली. आॅस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना अ‍ॅरोन फिंचच्या शतकाच्या जोरावर ६ बाद २९३ धावा उभारल्या. भारताने हे लक्ष्य ५ फलंदाजांच्या मोबदल्यात सहज पार केले. निर्णायक अष्टपैलू कामगिरी केलेल्या हार्दिक पांड्याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
होळकर स्टेडियमवर धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा - अजिंक्य रहाणे या सलामीवीरांनी आक्रमक सुरुवात करताना आपला इरादा स्पष्ट केला. या दोघांनी १३९ धावांची जबरदस्त सलामी देत भारताच्या विजयाचा पाया रचला. रहाणेने ७६ चेंडूत ९ चौकारांसह ७० धावा काढल्या. रोहितने ६२ चेंडूत ६ चौकार व ४ षटकार ठोकत ७१ धावांची खेळी केली. हे दोघेही पाठोपाठ बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली (२८) आणि केदार जाधव (२) फारशी चमक न दाखवता बाद झाले. त्यामुळे भारताचा डाव १ बद १३९ धावांवरुन ४ बाद २०६ असा घसरला.
मात्र, दुसºया बाजूने टिकून राहिलेल्या हार्दिक पांड्याने आपला दांडपट्टा सुरु ठेवल्याने भारताने आवश्यक धावगती कायम आपल्या नियंत्रणात राखली. हार्दिकने ७२ चेंडूत ५ चौकार व ४ षटकारांचा तडाखा देत ७८ धावांची खेळी केली. कमिन्सने हार्दिकला बाद केले खरे, पण तो पर्यंत कांगारुंचा पराभव निश्चित झाला होता. हार्दिक परतला तेव्हा भारताला विजयासाठी १० धावांची आवश्यकता होती. मनिष पांड्ये (३६*) आणि फिनिशर महेंद्रसिंग धोनी (३*) यांनी भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
तत्पूर्वी, दुखापतीमुळे पहिले दोन सामने न खेळलेल्या अ‍ॅरोन फिंच याने मालिकेत पदार्पण करताना झळकावलेल्या शानदार शतकाच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने आव्हानात्मक मजल मारली. गेल्या दोन सामन्यांत वर्चस्व राखलेल्या भारतीय गोलंदाजांना या सामन्यात फारसा प्रभाव पाडता आला नाही. फिंचने केवळ पुनरागमन न करताना शानदार शतक झळकावत संघाला आव्हानात्मक मजल मारुन दिली. त्याचवेळी, वॉर्नरही काहीसा फॉर्ममध्ये परतल्याने आॅस्ट्रेलियाला अर्धशतकी सलामी देता आली. फिंचने १२५ चेंडूत १२ चौकार व ५ षटकार ठोकत १२४ धावांची खेळी केली. तसेच, वॉर्नरने ४४ चेंडूत ४ चौकार व एका षटकरासह ४२, तर कर्णधार स्टीव्ह स्मिथनेही ७१ चेंडूत ५ चौकारांसह ६३ धावा काढल्या.
हार्दिक पांड्याने भारताला पहिले यश मिळवून देताना वॉर्नरचा त्रिफळा उडवला. यानंतर फिंच व स्मिथ यांनी १५४ धावांची मजबूत भागीदारी करत आॅस्ट्रेलियाची तिनशेच्या दिशेने कूच ठेवली. यावेळी, आॅस्ट्रेलियाला सहजपणे तिनशेचा पल्ला गाठेल असेच चित्र होते. मात्र, गतसामन्यातील हॅट्ट्रीकवीर कुलदीप यादवने शतकवीर फिंचला बाद करुन ही जोडी फोडली. यानंतर, आॅसी फलंदाजीला गळती लागली. ग्लेन मॅक्सवेल पुन्हा एकदा युझवेंद्र चहलचा बळी ठरला. ३२ धावांत ४ बळी गेल्याने आॅसीच्या धावगतीला ब्रेक बसला.
अष्टपैलू मार्कस स्टोइनिस याने जबाबदारीपूर्वक खेळताना २८ चेंडूत १ चौकार व एका षटकारासह नाबाद २७ धावा आणि अ‍ॅश्टन एगरने ६ चेंडूत एका चौकारासह नाबाद ९ धावा केल्याने आॅस्ट्रेलियाने मजबूत धावसंख्या उभारली. भारताकडून गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. युझवेंद्र चहल व हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

धावफलक
आॅस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर त्रि. गो. हार्दिक ४२, अ‍ॅरोन फिंच झे. केदार गो. कुलदीप १२४, स्टीव्ह स्मिथ झे. बुमराह गो. कुलदीप ६३, ग्लेन मॅक्सवेल यष्टीचीत धोनी गो. चहल ५, ट्राविस हेड त्रि. गो. बुमराह ४, मार्कस स्टोइनिस नाबाद २७, पीटर हँड्सकॉम्ब झे. मनिष गो. बुमराह ३, अ‍ॅस्टन एगर नाबाद ९. अवांतर - १६, एकूण : ५० षटकात ६ बाद २९३ धावा.
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार १०-०-५२-०; जसप्रीत बुमराह १०-०-५२-२; युझवेंद्र चहल १०-०-५४-१; हार्दिक पांड्या १०-०-५८-१; कुलदीप यादव १०-०-७५-२.
भारत : अजिंक्य रहाणे पायचीत गो. कमिन्स ७०, रोहित शर्मा झे. कार्टराइट गो. कुल्टर - नाइल ७१, विराट कोहली झे. फिंच गो. एगर २८, हार्दिक पांड्या झे. रिचडर््सन गो. कमिन्स ७८, केदार जाधव झे. हँड्सकॉम्ब गो. रिचर्डसन २, मनिष पांड्ये नाबाद ३६, महेंद्रसिंग धोनी नाबाद ३. अवांतर - ६. एकूण : ४७.५ षटकात ५ बाद २९४ धावा.
गोलंदाजी : पॅट कमिन्स १०-०-५४-२; नॅथन कुल्टर - नाइल १०-०-५८-१; केन रिचडर््सन ८.५-०-४५-१; मार्कस स्टोइनिस ८-०-६१-०; अ‍ॅश्टन एगर १०-०-७१-१; ग्लेन मॅक्सवेल १-०-२-०.

Web Title: India's winning lead, winners of World Cup Kangaroo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.